मुंबई – कोरोना महामारी जितकी भयानक आहे, तितकीच विचित्रसुद्धा आहे. या आजाराच्या रहस्याबाबत वैज्ञानिक दररोज नवे खुलासे करत आहेत. कोरोनामुळे १८ टक्के होणार्या मृत्यूंना माणसाच्या शरीरात उत्पन्न झालेल्या वाईट अँटिबॉडीज जबाबदार आहेत, असा खुलासा एका नव्या संशोधनात झाला आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्तींवर हल्ला करणार्या या अँटिबॉडीजना ऑटोअँटिबॉडीजही म्हटले जाते.
सायन्स इम्युनोलॉजी या नियतकालिकात याबद्दल सविस्तर संशोधन नुकतेच प्रकाशित झाले आहे. याच आधारावरून नेचर या नियतकालिकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, माणसाच्या शरिरातील काही सक्रिय अँटिबॉडीज कधी-कधी रोगप्रतिकारक तंत्राच्याच वैरी होतात. याच्या कारणाचा शोध लागलेला नाहीय. परंतु कोरोना महामारीत ३५ हजार कोरोनामुक्त झालेल्या लोकांवर झालेल्या अभ्यासात असे लक्षात आले आहे की, १८-६९ वर्षांच्या ०.१८ टक्के लोकांमध्ये तसेच ७०-७९ वर्षांच्या १.१ टक्के लोकांमध्ये या प्रकारच्या दुष्ट अँटिबॉडीज पाहिल्या गेल्या आहेत. वयबरोबरच या अँटिबॉडीजही वाढतात. परंतु कोरोना रुग्णांमध्ये या अँटिबॉडीज अधिक प्रमाणात आढळल्या आहेत.
३८ देशांत तपासणी
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने जगभरातील ३८ देशांच्या ३,५९५ गंभीर कोरोना रुग्णांमधील अँटिबॉडीजची तपासणी केली. त्यामध्ये १३.६ टक्के रुग्णांमध्ये अशा अँटिबॉडीज आढळल्या. ४० वर्षांहून कमी वयाच्या ९.६ आणि ८० हून अधिक वयाच्या २१ टक्के रुग्णांमध्ये अशा अँटिबॉडीज आढळल्या आहेत. ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, अशांमध्ये १८ टक्के अँटिबॉडीज आढळल्या आहेत.
उपचारासाठी संशोधन महत्त्वाचे
संशोधनात सहभागी झालेले न्यूयॉर्कचे रॉकफिलर विद्यापीठाचे इम्युनोलॉजिस्ट जीन लॉरेंट म्हणाले, की आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सरासरी दहा टक्के तसेच मृत्यू झालेल्या सरासरी पाचपैकी एका रुग्णामध्ये ऑटोअँटिबॉडीज आढळल्या आहेत. परंतु कोरोनारुग्णांमध्ये अशा प्रकारच्या अँटिबॉडीजच्या अतिसक्रियतेचे कारण अद्याप संशोधकांना समजू शकले नाही. मात्र हे संशोधन कोरोना उपचारांसाठी महत्त्वाचे आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. रुग्णांमध्ये या अँटिबॉडीजचे निदान झाला तर या तथ्यांना लक्षात घेऊन उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी या अँटिबॉडीजची तपासणी केली पाहिजे.