अहमदनगर – पूर्वी शालेय अभ्यासक्रमातील पाठयपुस्तकात ‘मरण स्वस्त होत आहे’, अशा आशयाचा एक धडा होता, त्याची आठवण व्हावी, अशा घटना सध्याच्या कोरोना काळात घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच चितेवर तब्बल आठ मृतदेहांना जाळण्यात आले होते. त्यास तीन-चार दिवस उलटत नाहीत, तोच नगर जिल्ह्यात देखील अशीच किंबहुना याहीपेक्षा भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. एकाच दिवसात तब्बल ४२ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यातील २२ मृतदेह जाळण्यासाठी पुरेशी लाकडेही नव्हती. याप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून ही घटना संपूर्ण देशभरातच चर्चेची ठरली आहे.
कोरोना विषाणूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराला जाता येत नाही की, त्यांना अंतिम निरोप देखील देता येत नाही, अशी वाईट परिस्थिती सध्या दिसून येते. अहमदनगरमध्ये एकाच रुग्णवाहिकेतून आणि त्याच्या टपावरून १२ मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्याचे प्रकरण मागे पडत नाही की, तोच असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कोरोनात मृत पावलेल्याचे सहा जणांचे पार्थिव देह अंत्यसंस्कारांसाठी एकाच अॅम्बुलन्समध्ये एकमेकांवर ठेवण्यात आल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवार रात्रीपर्यंत एकूण ४२ मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यापैकी स्मशानभूमीत २० मृतदेह जाळण्यात आले आणि २२ मृतदेह जाळण्यासाठी पुरेशी लाकडेच नव्हती, त्यामुळे केवळ बांबू, काड्या आणि गवत यावर डिझेल टाकून मृतदेहांना जाळण्यात आले. इथली परिस्थिती एवढी वाईट आणि भयानक दिसत होती की, अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचारी लोकांना हात-मोजेसुद्धा नव्हते आणि त्यांचे मास्कदेखील तोंडावर घसरताना दिसत होते.
विशेष म्हणजे संसर्ग आणि आरोग्याच्या कारणांमुळे मृताच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहू दिले नाही. शेवटच्या क्षणीही या मृतदेहांची इतकी हेळसांड आणि अन्याय का? असा प्रश्न विचारत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्मशानभूमीत प्रत्येकी एका सरणावर सहा मृतदेह जाळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकाच वेळी सहा मृतदेह जाळणे अमानवीय असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले. तर माजी मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही घटनेचे दुर्दैवी वर्णन केले आहे.
याप्रकरणी भाजपने केलेली टीका अशी