दिंडोरी : कोरोना सर्व्हेक्षण करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यास नकार देऊन आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांसोबत उर्मट भाषेत बोलून गैरवर्तणूक करणाऱ्या ग्रामसेवक के.जे.शिरोरे यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी बोपेगाव ता दिंडोरी येथील सरपंच वसंतराव कावळे यांनी गट विकास अधिकारी यांचेकडे केली आहे
कोरोना ग्रामीण भागात धुमाकूळ घालतो आहे एका बाजूला महसूल व पोलीस यंत्रणा जीवाच रान करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्तरावर महत्वाचा घटक असलेले ग्रामसेवक शहरात राहून आडमुठेपणा करून गावातील लोकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं चित्र दिंडोरी तालुक्यात दिसत आहे.
यासंदर्भात अधिक माहीती अशी बोपेगाव येथे गाव पातळीवर कोरोना बाधित रुग्णाचा सर्व्हे करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार स्थानिक आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांनी ग्रामसेवक के.जे.शिरोरे यांची भेट घेऊन ऑक्सिमिटर, थर्मल गन व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ग्रामसेवकानी सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चा न करता परस्पर यासंदर्भात ग्रामपंचायत काहीही उपलब्ध करून देऊ शकत नाही असे सांगून तुम्ही सरकारी दवाखान्यात जा व तिकडे तुम्हाला काय हवं ते मागा असे उर्मटपणे बजावले. या अनपेक्षित प्रकारमुळे मनस्ताप झालेल्या आशा सेविकांनी सरपंच वसंतराव कावळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत चौकशी केली. ग्रामसेवक शिरोरे यांनी त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून सरपंच कावळे यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी डॉ संदीप आहेर व गट विकास अधिकारी भावसार यांचेकडे तक्रार केली आहे.
तालुक्यातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वैदयकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी आपापल्या यंत्रणा सक्षम पणे कामाला लावल्याचे चित्र असले तरी गावच्या तिजोरीची चावी ज्याच्या हाती आहे. असे ग्रामसेवक मात्र या कामात हेतुपुरस्सर आडमुठेपणा करत असल्याची तक्रार अनेक सरपंच व वैदयकिय अधिकारी कर्मचारी करत आहे. यात प्रामुख्याने गावात कोरोना सदृश रुग्णाची प्राथमिक स्तरावर सर्व्हे करून तपासणी करणे अभिप्रेत आहे. याकामी आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, शासनाने नेमून दिलेले पर्यवेक्षक यांनी एकत्रितपणे गावातील नागरिकांची ऑक्सिजन पातळी, तापमान, इतर काही लक्षणे दिसून येतात का हे तपासून प्राथमिक सर्व्हे करण्याबाबत महसूल आयुक्तांनी आदेश काढले आहेत. मात्र या कामी आवश्यक साहित्य ऑक्सिमिटर,थर्मल गन, सॅनीटायझर इ.साहित्य खरेदी करून देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची असताना काही ग्रामसेवक या कामी हात झटकत आहे. हे काम ग्रामपंचायतचे नसून आरोग्य विभागाचे आहे. त्यांच्याकडून तुम्हाला हवं ते साहित्य मागवून घ्या अस उपदेश आशा स्वयंसेविकाना देऊन हात झटकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे. शिवाय अनेक ग्रामसेवक राहायला नाशिक शहरात असल्यामुळे ते आठवड्यातून एखाद्या दिवशी गावात उपस्थित राहत असून पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील संघटनेच्या दबावामुळे अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे अनेक सरपंच पण हतबल झाले आहेत.
ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे
ग्रामपंचायत बोपेगाव येथील ग्रामसेवक के.जे.शिरोरे यांनी ग्रामपंचायत व्यवस्थापनाला कोणतीही कल्पना न देता आशा स्वयंसेविकाना करोना सर्व्हे साठी लागणारे साहित्य खरेदी करून देण्यास नकार दिला. उलट त्यांच्याशी उर्मटभाषेत बोलून त्यांना सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. याबाबत ग्रामसेवकाना जाब विचारला असता सध्या मी सुट्टीवर आहे. सोमवारी आल्यानंतर बघू असे उत्तर दिले. या बेजबाबदार ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे
वसंतराव कावळे, सरपंच बोपेगाव