विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशभरात कोरोनारुग्णांचा स्फोट झालेला असताना मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या आठवड्यात वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार २ मेपर्यंत मुंबईत १ लाखाच्या वर सक्रिय रुग्ण असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारच्या ११ मेपर्यंतच्या नव्या अंदाजानुसार मुंबई रुग्णसंख्या घटण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवरील सक्रिय रुग्ण घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या आधीच्या अंदाजानुसार, २ मेपर्यंत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १.५ लाखांच्यावर जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. आता नव्या अंदाजानुसार ११ मेपर्यंत रुग्णसंख्या घटण्याची शक्यता आहे. सध्या ऑक्सिजन बेडवरील ६,४३३ रुग्ण, आयसीयू बेडवरील १,४७७ रुग्ण आणि व्हेंटिलेटर बेडवरील १२१ रुग्ण घटले आहेत. सध्या मुंबईत ६७,२५५ सक्रिय रुग्ण आहेत. मात्र ११ मेपर्यंत हाच आकडा ६५ हजारांच्या खाली येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या डाटानुसार आठवड्याचा रुग्णसंख्येचा दर १.५ टक्क्यांवरून ०.९ टक्क्यापर्यंत घटला आहे.
रुग्ण घटण्याची शक्यता
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे आधी वर्तविण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत सध्याची राज्याची स्थिती समाधानकारक आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे ३० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या ११ ते १२ लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. २ मेपर्यंत १०.९ लाख सक्रिय रुग्ण आढळतील असा अंदाज होता. आताच्या अंदाजानुसार ११ मेपर्यंत रुग्णसंख्या ९.४ लाखापर्यंत खाली येईल. म्हणजेच सध्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्या ४० टक्क्यांनी खाली येणार आहे.