नवी दिल्ली – जगभरात हाहाकार माजविणारा कोरोना विषाणू दिवसेंदिवस नवनवीन निर्णय घेण्यास भाग पाडत आहे. आतापर्यंत आरोग्य क्षेत्राच्या भरवश्यावरच कोरोनाचा मुकाबला केला जात आहे. मात्र, आता या लढ्यात थेट लष्करालाच पाचारण करण्यापर्यंतची वेळ येऊन ठेपली आहे. जगात प्रथमच असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. हा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया आहे.
कितीही नाकारत असले तरी कोरोना विषाणूने चीनच्या नाके नऊ आणले आहेत. गेल्या चोवीस तासात डेल्टा व्हेरिएंटचे ६४ नवे रुग्ण आढळल्याची माहिती चिनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. तर ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे आक्रमक रूप पाहून लॉकडाउन लावल्यानंतरही सरकारने लष्कराला पाचारण केले आहे. अशाच प्रकारे जगात इतर देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातल्याने सरकारी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधूनच झाल्याचा दावा अमेरिकेसह अनेक देशांनी केला आहे. तो दावा चीनने फेटाळला असला तरी तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. चीनमध्ये एका दिवसापूर्वी कोरोनाचे ४९ रुग्ण आढळले होते. त्यापैकी २१ रुग्ण स्थानिक आणि बहुतांश रुग्ण जिंगासू प्रांतातील रहिवासी आहेत. जिंगासू प्रांताची राजधानी नानजिंगमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रकोप वाढला आहे.
लष्कर तैनात
ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्येसुद्धा डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ५० लाख लोकसंख्या असलेल्या सिडनीमध्ये लष्काराला पाचारण करून ३०० जवानांना तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि लॉकडाऊनचे तंतोतंत पालन व्हावे हा यामागचा उद्देश आहे. तसेच सर्वाधिक बाधित परिसरात कोरोनाची चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानातील सफाई कर्मचाऱ्यांमुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने विमानतळ बंद केले आहे. सोबतच शहरात चाचण्यांना वेग आला आहे.
मनिलामध्ये डेल्टाची दहशत
फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुत्रेत्रे यांनी राजनधानी मनिलामध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मनिलामध्ये डेल्टाची दहशत आहे. मनिला ६ ते २० ऑगस्टपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. सरकारने भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि यूएईमधून १५ ऑगस्टपर्यंत विमानसेवा बंद ठेवली आहे.
मलेशियामध्ये भयावह परिस्थिती
कोरोनामुळे मलेशियामधील परिस्थिती गंभीर आणि भयावह झाली आहे. एका वृत्तानुसार, बुधवारी प्रति दहा लाख लोकांमध्ये ४८४ लोकांना संसर्ग झाला आहे. विषाणूचा विळखा असाच राहिला तर मृत्यूचे प्रमाण वाढून आलेख चढाच राहण्याची शक्यता आहे.