नवी दिल्ली – कोरोना विषाणूविरोधातील लढाईत देशातील आरोग्य कर्मचा-यांना लशीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार सुरू आहे. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. नेचर या वैद्यकीय नियतकालिकात अनेक देशांच्या वैज्ञानिकांचे संयुक्त संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचा-यांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग होत आहे. बहुतांश आरोग्य कर्मचा-यांना दुस-यांदा संसर्ग झाल्यानंतर गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. परंतु त्यांना विलगीकरणात राहावे लागत आहे. संशोधनात नवी दिल्लीतील आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल सहभागी झाले होते. ते सांगतात, या परिस्थितीमुळे आरोग्य कर्मचा-यांचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी त्यांना लवकरच एक बुस्टर डोस देण्याची गरज आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-यांच्या माहितीनुसार, बुस्टर डोसवर वैज्ञानिक पुरावे कमी असल्यामुळे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीआमआर) एक पथक यावर काम करत आहे. लसीकरणासंदर्भात गठित एक राष्ट्रीय तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य सांगतात, कोविशिल्ड, कोवॅक्सिनचा बुस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर आरोग्य कर्मचार्यांना लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर बुस्टर डोस देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबईत तिसरी लाट – महापौर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मंगळवारी म्हणाल्या, की कोरोनाच्या दुस-या लाटेत आपल्याला खूप काही शिकायला मिळाले आहे. मी गणेश चतुर्थीला कुठेही जाणार नाही. कारण तिसरी लाट आली आहे. निर्बंध लावण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. लोकांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे.