विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटची घातकता ओळखून केंद्र सरकार सतर्क झाले आहे. तिसरी लाट आली तरी, कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी केंद्राने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक सूचना करण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने पाच मंत्र दिले असून, त्याची अंमलबजावणी त्वरित करावी अशा सूचना केल्या आहेत.
कोरोना व्यवस्थापनासाठी पाचस्तरीय रणनीतीवर लक्ष केंद्रित करा अशा सूचना केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्य सरकारांना केल्या आहेत. निर्बंध शिथिल करताना सतर्कता बाळगावी अशा सूचनाही केल्या आहेत. केंद्रीय गृहसचिव अजल भल्ला यांनी जुलै महिन्यासाठी कोरोना व्यवस्थापनाबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सूचना केल्या आहेत.
केंद्राने दिशानिर्देश जारी करत ज्या राज्यात १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या अधिक आहे, त्या राज्यांनी नियमित लक्ष ठेवून पायाभूत सुविधा वाढविणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णसंख्या वाढल्यास त्वरित पावले उचलली जावीत.
रणनीतीवर भर
कोरोनाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाचस्तरीय रणनीती बनविणे आवश्यक आहे. त्यामध्ये तपासणी- बाधितांचा शोध घेणे- उपचार- लसीकरण आणि कोविड-नियमांचे पालन करण्यावर नेहमी भर द्यावा. रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी कोवि़ड उपयुक्त व्यवहार म्हणजे नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे, असे भल्ला यांनी सांगितले.
सतर्कता बाळगा
अनेक राज्यांनी उपचाराधीन रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. निर्बंध शिथिल करण्याच्या प्रक्रियेत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, त्वरित आणि योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करताना कोणत्याही त्रुटी ठेवू नये. कोविड व्यवस्थनाबाबत २८ जूनला जारी केलेल्या पत्रानुसार, सर्व जिल्हे तसेच संबंधित अधिकार्यांना दिशानिर्देश जारी करून आवश्यक उपाययोजना कराण्याचे आदेश द्यावेत असे त्यांनी म्हटले आहे.
पायाभूत सुविधा
जिल्हा प्रशासनाने नियमितरित्या पॉझिटिव्हिटी रेट आणि बेडच्या संख्येवर लक्ष ठेवावे. रुग्णसंख्या वाढत असल्यास आणि बेडची अनुप्लब्धतेचे संकेत मिळाल्यास त्वरित पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला द्याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.