नवी दिल्ली – कोविड व्यवस्थापनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकार वेळोवेळी,विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना भेट देण्यासाठी केंद्रीय पथके पाठवत असते. ही पथके राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तिथली आव्हाने आणि समस्या जाणून घेतात. यामुळे जर काही अडथळे असतील तर ते दूर करून कोरोना प्रतिबंधासाठीचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी सहाय्य होते.
केंद्र सरकारने आज केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओदिशा, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यात कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पथके नियुक्त केली आहेत. कोविड व्यवस्थापनातल्या प्रयत्नात आणि महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ही पथके या राज्यांना सहाय्य करणार आहेत. दोन सदस्यीय या उच्च स्तरीय पथकामध्ये सार्वजनिक आरोग्य तज्ञाचाही समावेश आहे. ही पथके राज्यांना तातडीने भेट देऊन कोविड व्यवस्थापन, चाचण्या, प्रतिबंधात्मक कार्य आणि देखरेख, कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन आणि त्याची अंमलबजावणी, रुग्णालयातल्या खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटीलेटर्स, वैद्यकीय ऑक्सिजन, लसीकरणाबाबत प्रगती यांचा आढावा आणि देखरेख ठेवेल आणि उपचारात्मक सूचनाही करेल. अहवालाची प्रत केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाही देण्यात येणार आहे.