लखनऊ – येथील केंद्रीय औषध संशोधन संस्थेने (सीडीआरआय) कोरोनावर प्रभावी उमिफेनोवीर हे स्वदेशी औषध बनविल्याचा दावा केला आहे. या विषोणूविरोधी औषधाचे तिस-या टप्प्यातील परीक्षण यशस्वी झाले आहे. कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उमिफेनोवीर हे औषध प्रभावी असेल. तसेच उच्च जोखीम असलेल्या रुग्णांना रोग प्रतिबंधक म्हणून उपयोगी असेल, असा दावा संस्थेने केला आहे. हे औषध पाच दिवसात विषाणूच्या संसर्गाला पूर्णपणे निस्तेज करते, असा दावाही करण्यात आला आहे.
सीडीआरआयचे संचालक प्रा. तपस कुंडू सांगतात, केंद्र सरकारच्या औषधे महानियंत्रकांनी (डीसीजीआय) गेल्या वर्षी जूनमध्ये केजीएमयू, एरा लखनऊ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या सहकार्याने सीडीआरआयला लक्षणे विरहित, कमी तसेच मध्यम कोविड रुग्णांवर तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल परीक्षणाला परवानगी देण्यात आली होती. सीएसआयआरने १६ औषधे दिली होती. त्यापैकी परीक्षणात उमिफेनोवीर (आर्बिडोल) ची निवड करण्यात आली.
डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी
प्रा. कुंडू सांगतात, उमिफेनोवीर टॅबलेटच्या रूपात आहे. सिरप आणि इनहेलरच्या स्वरूपातही त्याला विकसित केले जात आहे. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरही याचे परीक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे हे औषध डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. १३२ रुग्णांवर क्लिनिकल परीक्षण करण्यात आले आहे.
पाच दिवसांच्या औषधासाठी ६०० रुपये
सार्स कोविड-१९ च्या सेल कल्चरला उमिफेनोवीर खूपच प्रभावी पद्धतीने नष्ट करते. मानवी पेशींमध्ये विषाणूला प्रवेश करण्यास ते रोखण्यास मदत करते. पाच दिवसांच्या औषधाला ६०० रुपये खर्च येणार आहे. डीसीजीआयने क्लिनिकल परीक्षणाच्या अहवालाचे मूल्यांकन करून आपात्कालीन वापरसाठी मान्यता देण्यासह अधिक संख्येत कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर संशोधन सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उमिफेनोवीरच्या पेटंटची तयारी
कोरोनाचे औषध उमिफेनोवीरच्या पेटंट करण्याची तयारी सीडीआरआयने सुरू केली आहे. प्रा. कुंडू सांगतात, या औषधाचे डबल ब्लाइंड प्लेसिबो नियंत्रित क्लिनिकल परीक्षण करून संशोधन करण्यात आले आहे. जगातील अशा प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. या औषधाच्या डोसचे पूर्वी कधीही सार्स कोविड २ विरोधात परीक्षण करण्यात आलेले नाही.