पॅरिस – युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने आता निर्बंध हटविण्यास सुरुवात झाली आहे. फ्रांसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरंट आणि कॉफी हाउस सुरू झाले आहेत. ऑस्ट्रियामध्येसुद्धा हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. फ्रांसमध्ये सहा महिन्यांपासून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्याटप्प्यांनी शिथिल करण्यात आले. संचारबंदीची वेळ सात वाजण्याऐवजी नऊ वाजेपासून करण्यात आली. त्यानंतर संग्रहालय, चित्रपटगृहे आणि खुल्या ठिकाणावरील कॉफी हाऊस बुधवारी सुरू करण्यात आले. कॉफी हाउस उघडण्याच्या एक दिवसाआधी राष्ट्रपती इमॅन्युएल मायक्रो आणि पंतप्रधान जीन कास्टेक्स एका कॉफी हाउसच्या टेरेसवर चर्चा करताना दिसले होते.
अनेक युरोपीय देशांमध्ये रेस्टॅारंट खुले
फ्रांसच नव्हे तर युरोपमध्ये इटली, बेल्जियम, हंगेरी आणि ऑस्ट्रियामध्येही खुल्या ठिकाणांवरील रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. फ्रांसमध्ये रात्री ११ वाजेपासून संचारबंदी लावण्याचे नियोजन आहे. फ्रांसच्या वरिष्ठ नागरिकांच्या ४० टक्के लोकसंख्येने लशीचा पहिला डोस घेतलेला आहे. युरोपियन युनियनने बाहेरील देशांच्या प्रवाशांना सूट देण्यास सुरुवात केली आहे. आधी केवळ लसीकरण झालेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली होती.
ऑस्ट्रियामध्ये सहा महिन्यांनंतर हॉटेल सुरू
ऑस्ट्रियामध्ये सहा महिन्यांनंतर हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. ग्राहकांना मास्क आणि शारिरीक अंतर राखणे अनिवार्य असणार आहे. सभागृहात दीड हजार आणि बाहेर तीन हजार लोक कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहे. बार आणि रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे परिस्थिती गंभीर होती मात्र आता हळूहळू नियमांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. न्यूयॉर्कमध्ये आता रेस्टॉरंट, क्लब, दुकाने आणि जिम उघडण्यात आले आहेत.
नेपाळ – नेपाळमध्ये बी.६१२.२ व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत. नेपाळमध्ये आतापर्यंत तीन व्हेरियंट आढळले आहेत.
ब्राझील – ब्राझिलमध्ये दररोज होणा-या मृत्यूंची संख्या अडीच हजार आहे. गेल्या २४ तासात ७५ हजार रुग्ण आढळले आहेत.
पाकिस्तान – गेल्या चोवीस तासात पाकिस्तानात ३२०० नवे रुग्ण आढळले आहेत. १०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
रशिया – रशियात एका दिवसात जवळपास आठ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राजधानी मॉस्को सर्वाधिक प्रभावित झालेली आहे.