विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्याच्या अनेक भागात कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असताना काही जिल्हे अद्यापही हॉटस्पॉट असल्याची बाब समोर आली आहे. खासकरुन कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज रविवारी ८ हजार ५३५ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तर, ६ हजार १३ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. गेल्या २ तासात कोल्हापूर मध्ये १ हजार १९३ तर सांगलीत ९२७ नवे कोरोना बाधित आढळले आहेत. या दोन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हजाराच्या आसपास नवे बाधित सापडत आहेत. त्यामुळे ही बाब चिंतेची असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. नांदेड आणि भंडारा जिल्ह्यात काल आणि आजही एकही नवा कोरोना रुग्ण सापडलेला नाही. तर, राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये (धुळे, हिंगोली, गोंदिया आणि यवतमाळ) अवघे १ ते ३ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्यापही लोप पावलेला नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा संसर्ग वाढण्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर राज्यातील निर्बंध आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.