मुंबई – कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मोठ्या अर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र आता त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. कुठलीही परिस्थिती उद्भवली तरीही भविष्य निधी कार्यालयातून मिळणाऱ्या कोरोना अॅडव्हान्समधून त्यांचे संकट दूर होऊ शकणार आहे.
कोरोना अॅडव्हान्ससाठी अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये तीन महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम अॅडव्हान्सच्या रुपात मिळणार आहे. भविष्य निधी कार्यालयात यासाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. गेल्यावर्षी कोरोना पाय पसरत असताना लाखों लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तेव्हा केंद्र सरकारने दिलासा देण्यासाठी भविष्य निर्वाह निधीतून १५ हजार रुपये बेसिक असणाऱ्यांना तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम देण्याची तरतूद केली होती. तेव्हा आर्थिक संकट दूर करण्यासाठी अनेक जण भविष्य निधी कार्यालयात पोहोचले होते. कित्येक अर्ज या अॅडव्हान्ससाठी आले होते. २०२० मध्ये कोरोना अॅडव्हान्ससाठी आलेल्या हजारो लोकांना कोट्यवधी रुपये देण्यात आले.
आताही अशाच प्रकारे कोरोना अॅडव्हान्स देण्याची तयारी करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून त्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.