मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि १५ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार दि. ०१ एप्रिल २०२१ ते दि. ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया दिनांक ०१ मार्च २०२३ पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी दि. ०१ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे प्राधिकरणाने सन २०२३ मधील दि. ०१ जानेवारी २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीतील निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी अनुक्रमे १५०, १२०, ६० व ६० दिवस अगोदर सुरु करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
ज्या सहकारी संस्था निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, नियम १९६१ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे ६३, १०१४, १०१६३ व ९३९८ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अ वर्ग संस्थांमध्ये प्रामुख्याने २८ सहकारी साखर कारखाने, ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, २६ सहकारी सुतगिरण्यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
Cooperative Institutes Election Process Will Start