पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. येथील सहकार आयुक्तालयामध्ये ७५१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका.
सहकार आयुक्तालयांतर्गत ७५१ पदांची भरती लवकरच करण्यात येणार असून, त्यापैकी ४४८ लिपिक आणि टंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे. १५ ऑगस्ट पूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आयुक्तालयाने दिली. त्यामध्ये सहकार आयुक्तालयात २६, मुंबई- ३६, कोकण -२५, पुणे -३८, कोल्हापूर -३०, औरंगाबाद -३३, नाशिक- ६६, लातूर- ३६, अमरावती- ३३, नागपूर- ४३ लिपिकांच्या तर लेखापरीक्षकांमध्ये मुंबईतील २९, पुणे -१७, कोल्हापूर- ९, औरंगाबाद -१९, नाशिकमधील ८ पदांचा समावेश आहे. त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय सह निबंधकांनी त्यांच्याकडील प्रशासन व लेखापरीक्षकांची सरळसेवा बिंदूनामावली नुसार आरक्षणानुसार पदे निश्चित करावीत आणि त्यानुसारचे मागणीपत्र सहकार आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
अन्य महत्वाच्या भरती
सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील ३०३पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसबरोबर करार केला असून १५ ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी दोन, वरिष्ठ लिपिक, सहायक सहकार अधिकारी, लघुटंकलेखक व लेखापरीक्षक श्रेणी दोन या पदांचा समावेश आहे. गट ‘क’ संवर्गातील पदांमध्ये सहकार आयुक्तालय मुख्यालयात २९, पुणे -२३, कोल्हापूर -२६, अमरावती -३६, औरंगाबाद -२४, नाशिक -४०, कोकण -२७, मुंबई- २३, लातूर -३०, नागपूर- ३८ व लेखापरीक्षकांची ७ पदे नाशिक जिल्ह्यासाठी भरण्यात येतील. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्यावी
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/SITE/Home/Home.aspx
Cooperative Commissionerate Recruitment Job Vacancy