नवी दिल्ली – हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने १५ वर्षांच्या जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी आणली. त्या धोरणावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचे पुढचे पाऊस म्हणून दिल्ली सरकारने सुद्धा जुन्या डिझेल वाहनांसाठी एक धोरण आखले आहे. त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
दिल्ली सरकारने जुन्या डिझेल वाहनांच्या मालकांना नुकताच दिलासा दिला आहे. सरकारने दहा वर्ष जुन्या डिझेल वाहनांना वापरण्याचा मार्ग मोकळा केला आहे. पण त्यासाठी तुम्हाला डिझेल कार इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करावी लागेल. इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित केल्यानंतर दिल्ली सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. दिल्लीत दहा वर्ष जुन्या डिझेल वाहनांवर बंदी घातली आहे.
दिल्लीचे वाहतूक मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, दिल्ली आता इंटरनल कंब्शन इंजिन (आयसीई) च्या इलेक्ट्रिक रेट्रोफिटिंगसाठी सज्ज झाली आहे. तुमचे वाहन फिट आढळले तर तुम्ही इलेक्ट्रिक इंजिन लावू शकतात. वाहतूक मंत्रालय लवकरच इलेक्ट्रिक किट बनविणार्या कंपन्यांची यादी शेअर केली जाणार आहे. डिझेल वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काय करावे लागेल हे जाणून घेऊया.
अशी करा इलेक्ट्रिक कार
१) डिझेल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करणे एखाद्या शस्त्रक्रियेपसारखेच असते. बहुतांश जुन्या डिझेल कारमध्ये बॅटरी लावण्याची सोय केलेली नसते. त्यामुळे इलेक्ट्रिक किट बनवणाऱ्या कंपन्यांना बरेच संशोधन आणि वाहनामध्ये विकास घडविण्याची गरज असेल. सर्वात प्रथम कारमधून डिझेल इंजिन काढले जाईल. त्या जागेवर इलेक्ट्रिक मोटर, हाय-व्होल्टेज वायरिंग सर्किट आणि कंट्रोल युनिट फिट केले जाईल.
२) दुसरे काम बॅटरी फिटिंग करण्याचे असेल. डिजेल टाकीच्या जागेवरच बॅटरी लावली जाण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजेच मागच्या सीटाखाली किंवा बोनटच्या खाली. वाहनामध्ये किती जागा आहे आणि बॅटरीची क्षमता किती आहे, यावरूनच बॅटरीची जागा ठरविली जाईल. जास्त रेंज असलेल्या बॅटरी पॅकचा आकारही मोठा असतो. त्याशिवाय इंधनाची टाकी हटवून त्याच्या कॅपवर चार्जिंग पॉइंट लावला जातो.
एवढा खर्च येईल
माध्यमांच्या वृत्तानुसार, डिझेल कार इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरित करण्यासाठी जवळपास ४ ते ६ लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. याची प्रक्रिया जटिल असल्याने डिझेल कार इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी लागणारा खर्च हा पेट्रोल कारला सीएनजीमध्ये रुपांतरित करण्याच्या खर्चापेक्षा अधिक असतो. तुम्हाला घरी एक चार्जिंग सेटअप उभारावा लागेल.