नवी दिल्ली – ड्रेस ऐवजी साडी घातलेल्या महिलेला दिल्लीच्या एका रेस्टॉरंटने चक्क आवारात देखील प्रवेश करण्यापासून रोखले होते. त्यामुळे दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने त्या हॉटेलवर कारवाई करत ते आता बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात सोशल मीडिया पोस्टमध्ये एका महिलेने आरोप केला की, ड्रेस ऐवजी तिने साडी घातली म्हणून दक्षिण दिल्लीच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. तसेच या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबत याबाबत वादाचा एक छोटासा व्हिडीओ आणि तिच्या साडीतील काही छायाचित्रांसह पोस्ट केले होते. मात्र त्यानंतर रेस्टॉरंटने दावा केला की, ही घटना चुकीची मांडली गेली आहे.
काँग्रेसचे नगरसेवक अभिषेक दत्त यांनी मनपाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला आणि पारंपरिक भारतीय पोशाख परिधान केलेल्या कोणालाही प्रवेश नाकारणाऱ्या कोणत्याही रेस्टॉरंट, बार किंवा हॉटेलवर सुमारे ५ लाख रुपये दंडाची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितले होते.
त्यानंतर अँड्र्यूज गंज येथील अक्विला रेस्टॉरंट वैध परवान्याशिवाय चालवण्यासाठी बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना हॉटेल तपासणी दरम्यान येथे सुविधाचा अभाव व अस्वच्छ परिस्थितीत आरोग्य व्यापार परवान्याशिवाय ते सुरु आहे. तसेच हॉटेलने सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर ४८ तासांच्या आत रेस्टॉरंट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. आता हॉटेल मालकाने हा व्यवसाय ताबडतोब बंद केला आहे.