मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत लोणावळा नगरपरिषदेने भूमिगत गटारीसाठी ठेकेदाराला दीड कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिल्याचे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांची चौकशी झालेली नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून महिनाभरात अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनिल शेळके यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले की, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत लोणावळा नगर परिषदेला भूमिगत गटारीसाठी २१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील ८ कोटी रुपये नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, नगरपरिषदेने त्यातील आगाऊ रक्कम म्हणून दीड कोटी रुपये ठेकेदाराला दिले, नंतरच्या काळात या ठेकेदाराकडून ६५ लाख रुपये वसूल केले असून उर्वरित रक्कम व्याजासह वसूल करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराने बनावट कागदपत्रे दिल्याचेही निदर्शनास आलेले असून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगून या प्रकरणात तत्कालिन मुख्याधिकारी आणि नगरअभियंत्यांची नगर परिषद प्रशासन संचालनालयाने चौकशी केली असून अभियंत्यांना अंशतः दोषी धरुन त्यांची वेतनवाढ रोखली आहे तर मुख्याधिकाऱ्यांना दोषमुक्त केले आहे. लोकायुक्तांनी देखील हे प्रकरण निकाली काढले होते, नंतरच्या काळात पुन्हा हे प्रकरण लोकायुक्तांकडे दाखल असून नगराध्यक्षांबाबत असलेल्या तक्रारींची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन अहवाल आल्यानंतर सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यमंत्री श्री. तनपुरे यांनी सांगितले.