इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॉम्प्युटरसमोर सतत बसून काम करत असल्याने अलीकडे पाठ दुखी, कंबर दुखी, मानदुखीचे आजार बळावत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ने तर अशा रुग्णांमध्ये अधिकच वाढ झाली. कॉम्प्युटरसमोर बसून हे त्रास होत असले तरी अनेकदा आपली बसण्याची पद्धतही चुकीची असल्याने आपल्याला या त्रासाला तोंड द्यावे लागते.
औषध घेऊन या मानदुखीवर तात्पुरता उपाय केला जातो. पण, हे दुखणे कायमस्वरूपी जात नाही. त्याचा त्रास सुरूच राहतो. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे केंव्हाही चांगले. स्नायूंवर पडणारा ताण, सांधेदुखी, संधिवात अशा आजारांमुळेही मानदुखीचा त्रास होऊ शकतो. या मानदुखीपासून बचाव करण्यासाठी व्यायामाचे काही सोपे पर्याय सांगितले जातात.
याशिवाय कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती, डेस्क, खुर्च्या यांची व्यवस्थित मांडणी आणि बैठक व्यवस्था योग्य असणे, हे देखील पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. एका अहवालानुसार, टेनिस बॉल घेऊन आपण मानेला वेगवेगळ्या प्रकारे मालिश करू शकतो. जिथे दुखणं जास्त आहे, तिथे त्या बॉलने थोडा दाब द्या. टेनिस बॉलमुळे स्नायूंचा कडकपणा दूर होतो.
धनुषमुद्रा
हे आसन करण्यासाठी जमिनीवर पालथे झोपा. तुमचे गुडघे वाकवा. दोन्ही हातांनी पायाचे घोटे पकडा. श्वास घेऊन तुमची टाच आणि मांड्या जेवढं होईल तेवढं वर उचला. १० सेकंद या परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडताना हळूहळू तुमचे शरीर जमिनीवर आणा. हे आसन स्नायू बळकट करण्यास मदत करते.
उंट मुद्रा
हे आसन मानदुखीसाठी अत्यंत प्रभावी आहे. जमिनीवर गुडघे टेकून आपले गुडघे आणि मांड्या जमिनीवर ठेवा. आपले तळवे ओटीपोटाच्या मागे ठेवा. आणि शरीर मागे खेचा. डोकेही मागे करा. ३० ते ६० सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा.
Continuous Sitting Back Pain Home Remedies