विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी आणि लॉकाडाउनसारखी पावले उचलली गेली आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्थानिक प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कोणत्याही जिल्हा, शहर किंवा परिसरात कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांहून अधिक किंवा ऑक्सिजन आणि आयसीयू बेड ६० टक्के भरल्यास स्थानिक प्रशासनाकडून तो भाग तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जावा. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृहमंत्रालयाने म्हटले की, पुराव्यांच्या आधारे, प्रभावित लोकसंख्या, भौगोलिक प्रसार, रुग्णालयांतील पायाभूत सुविधा, कर्मचारी आणि सीमांच्या आधारांवर विश्लेषण करून लॉकडाउन किंवा मोठे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केले जाते. राज्यांना लॉकडाउन लावण्यासाठी उद्देशपूर्ण, पारदर्शक निर्णय घेण्याच्यादृष्टीने एक व्यापक आराखडा देण्यात आला आहे. प्रतिबंध १४ दिवसांसाठी लागू केले जातील. प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यासाठी कोणत्याही भागाची ओळख पटल्यानंतरचे पुढील टप्पे याप्रमाणे ः
१) रात्रीची संचारबंदी – अत्यावश्यक सेवा सोडून रात्री प्रतिबंध लावण्यात यावा. संचारबंदीचा कालावधी स्थानिक प्रशासन ठरवेल.
२) राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सण आणि इतर सोहळ्यांवर प्रतिबंध असेल. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सामुहिक कार्यक्रमांवर निर्बंध हवेत, अशा सूचना आहेत.
३) लग्नसोहळ्यात ५० आणि अंत्यसंस्कारामध्ये २० लोकांची संख्या मर्यादित करण्यात आली आहे,
४) व्यावसायिक संकुल, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट आणि बार, क्रीडा संकुल, जिम, स्पा, जलतरणतलाव, धार्मिक स्थळे बंद राहणार
५) सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवा, सुरू राहतील.
६) रेल्वे, बस, मेट्रो, कॅब सारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्था क्षमेतेच्या निम्म्या प्रमाणात सुरू ठेऊ शकतात.
७) अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसह आंतररराज्यीय वाहतुकीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत.
८) कार्यालयात कर्मचार्यांची ५० टक्के उपस्थिती
९) औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रतिष्ठानांमध्ये शारिरीक अंतर राखण्यासारखे नियम लागू असतील.
१०) अशा प्रतिष्ठानांमध्ये वेळोवेळी रॅपिड अँटिजन टेस्ट केल्या जाव्यात.
ऑक्सिजनचा पुरेसा साठा
गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पीयूष गोयल म्हणाले, देशात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे. प्रश्न परिवहनाचा आहे, तोसुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ऑक्सिजनसाठी घाबरून जाण्याची गरज नाही.
२४ तासात ३.५२ लाख नवे रुग्ण
देशात गेल्या २४ तासात कोविडचे ३,५२९९१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १,७३,१३,१६३ वर पोहोचली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २८ लाखांवर गेली आहे. संसर्गामुळे २,८१२ लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढून १,९५,१२३ वर पोहोचला आहे.