विशेष प्रतिनिधी, मुंबई
दिनांक १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने दिनांक १३ एप्रिल रोजीच्या ‘ब्रेक द चेन’ आदेशाद्वारे विहित केलेल्या निर्बंधान्वये खालील बाबींचा अत्यावश्यक प्रवर्गांत समावेश केला आहे :
आगामी पावसाळी मोसमाच्या विविध साहित्याच्या उत्पादनात गुंतलेले व्यवसाय, छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री / दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मतानुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.
संबंधित सर्व व्यक्तींनी कोव्हिड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे याची पुनरुक्ती करण्यात येत असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु १० हजार दंड ठोठावण्यात येईल व कोव्हिड १९ महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.