विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता कॉंग्रेस पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होत आहे. पंजाब आणि राजस्थानमध्ये काँग्रेसअंतर्गत वाद सुरु असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (युपीए) मधील अन्य घटक पक्ष देखील काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक संशय हा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि त्यांच्या एकूण हालचालींवर आहे.
काही राज्यांमध्ये काँग्रेस हा युतीतील सर्वात मोठा पक्ष असूनही राष्ट्रवादीच्या मतदारसंघांतील हालचालीमुळे कॉंग्रेस आपले वर्चस्व गमावू शकते, अशी शंका काँग्रेस नेत्यांना वाटत आहे. कारण केरळमध्ये कॉंग्रेसमधून आलेल्या पी.सी. चाको यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या हालचालींभोवती काँग्रेसने संशयाचे जाळे विणणे सुरू केले आहे. कॉंग्रेसमध्ये असताना पीसी चाको यांनी संघटनेत अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अशा परिस्थितीत कॉंग्रेससमोर आपले पारंपरिक मतदार जपण्याचे आव्हान असेल.
दुसरीकडे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत यूपीएचा घटकपक्ष असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविला. राष्ट्रवादीशिवाय राजद, जेएमएम आणि शिवसेनाही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत होते. तसेच यापूर्वी कॉंग्रेसच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रवादी, आरजेडी आणि झामुमो निवडणूक लढवत असत आणि त्यांना एक ते दोन टक्के मते मिळाली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सर्वच प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न असा आहे की, कॉंग्रेस कमकुवत व्हावी. सध्या केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये तरी असेच चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती जाणवत नाही. त्यामुळे संशयाच्या या वातावरणातून पुढे नक्की काय घडते हे पाहणे औत्सुक्याचे बनले आहे.