नवी दिल्ली – सन २०१४ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे. या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येसुद्धा काँग्रेस सावरताना दिसत नाहीये. काही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली असली तरी ती टिकविण्याची धडपड करावी लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळत होणार्या निवडणुकांमध्ये वेगळी रणनीती आखून मोदी सरकारविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे.
काँग्रेसने आता रणनीतीमध्ये बदल केला असून, जातींचे समीकरणे सांभाळून धनाड्य वर्गालाही आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. काँग्रेसने ‘दमओ’ हा फॅक्टर चालविण्या निश्चित केले आहे. समाजातील दलित, महिला आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) या घटकांवर लक्ष केंद्रित करणे हा फॉर्म्युला याच रणनीतीचा भाग आहे. पक्षाच्या निर्णयांमध्ये समाजातील या तिन्ही वर्गांची छाप स्पष्टपणे दिसेल. २०२४ मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी हा फॉर्म्युला वापरण्याचे प्रयत्न काँग्रेस करणार आहे.
भाजप अनेक मुद्द्यांवर श्रीमंतांसोबत खांद्याला खांदा देऊन उभा असतो. त्यामुळे समाजातील दलित, मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहावे, असे काँग्रेसच्या धुरिणांचे स्पष्ट मत आहे. २००४ मध्ये ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ या स्लोगनद्वारे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. याच फॉर्म्युलाच्या माध्यमातून पुन्हा सत्ता काबीज करता येईल, असा विश्वास काँग्रेसच्या गोटात व्यक्त केला जात आहे.
अंमलबजावणी सुरू
पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री बनविणे असो किंवा उत्तर प्रदेशात ४० टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा असो. पक्षाकडून जवळपास प्रत्येक निर्णयात हा फॉर्म्युला वापरण्याचे प्रयत्न केले जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात याच फॉर्मुल्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. अशाच प्रकारे विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने कंबर कसली आहे.
काँग्रेसपूर्वी भाजप, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने महिलांचा विश्वास जिंकून सत्ता काबीज केली होती. पंतप्रधान उज्ज्वला योजनेने २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्याश्री योजनेने महिला मतदारांचा विश्वास जिंकण्याची मदत केली होती. दिल्लीमध्ये महिलांना मोफत बस प्रवासाची भेट देण्यात आली होती.
महिलांची भूमिका
भाजपच्या विजयात महिलांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती, असे काँग्रेसच्या रणनीतीकारांचे मत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारीही वाढली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ४८ टक्के महिलांची संख्या आहे. परंतु मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या बरोबरीत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६८ टक्के महिलांनी मतदान केले होते. तर पुरुषांची मतांची टक्केवारी ६८.३ टक्के होते.