अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्रात थोर पुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्याची राजकीय नेत्यांमध्ये जणू काही चढाओढ लागलेली दिसून येते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काही नेते विनाकारणच बेताल किंवा वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यातून मोठे वादंग निर्माण होऊन समाजातील सर्व राज्यातील वातावरण बिघडते. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते त्रिवेदी आणि आमदार प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना आता त्यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे, ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
नाना पटोले म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, दि१२ रोजी अकोल्यातील एका कार्यक्रमात केले. ते जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथील कुणबी समाजाच्या कार्यक्रम ठिकाणी माध्यमांशी बोलत होते.
आधी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता नाना पटोले यांच्या वक्तव्यानेही सर्व समाजामध्ये विपर्यास निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांनी शिवरायांबाबत केलेल्या या विधानामुळे आता नवा वाद उसळण्याची शक्यता आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, त्या व्यवस्थेला आत्महत्या करण्यास तुम्ही भाग पाडा, असे आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे.
कुणबी समाज व ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षा ही अनेक नेतृत्व आहेत. वेळ आणि नशीब हे प्रत्येकाचे कसे असते हे त्यावर सर्व अवलंबून आहे. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते. माझ्या अपेक्षा काय असतील या पेक्षा माझ्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या अपेक्षा काय आहे, यासाठी काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही पटोले यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून विदर्भातील जनतेची मोठी अपेक्षा होती. आज विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. येथील प्रकल्प गुजरातला जात आहेत. दौऱ्यामुळे कुठलाच फायदा झाला नाही, उलट निराशा झाली. या दौऱ्यासाठी मोठा खर्च आणि वेळ वाया गेला. तर हा दौरा म्हणजे जनतेला वेठीस धरणारा होता, असा आरोप नाना पटोले यांनी केला असून समृद्धी महामार्गामुळे फक्त काही नेते व अधिकाऱ्यांचीच समृद्धी झाली. लवकरच त्याचे पुरावे बाहेर काढू, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.
Congress State Chief Nana Patole on Chhatrapati Shivaji Maharaj