मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मैत्रीपुर्ण लढत होणार नाही असे काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी सांगितले. भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्यात महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीतील पक्षात अंतर्गत मतभेद मोठया प्रमाणावर आहेत. महायुती एक विचित्र युती आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागांवर भाजपने आपले उमेदवार दिले आहेत. त्यांच्या मतदार संघात देखील निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कोणताच प्रभाव नाही किंवा त्यांचे अस्तित्व देखील नाही. भाजपने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीतून संपवले आहे. मात्र महाविकास आघाडीत याउलट चित्र असल्याचेही चेन्निथला यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत आम्ही लहान पक्षांना ही सोबत घेतले आहेत. पण, महायुतीमध्ये भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना संपवले आहे. महाविकास आघाडीत एकता असल्यामुळे मैत्रीपुर्ण लढत होणार नाही. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले जातील.
भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन येथील कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे आज “भ्रष्टयुती महाराष्ट्राची दुर्गती” हे बुकलेट आणि “यंदा पंजा” हे प्रचारगीत महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आले.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. श्रीमती वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीचे सदस्य अरिफ नसीम खान, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश अध्यक्ष आ. श्री वजहात मिर्जा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.