नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत त्या कारने निघाल्या आणि हे तिघे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. राहुल आणि प्रियंका यांना एका स्वतंत्र खोलीत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कारण प्रियांका गांधी या सोनिया गांधी यांच्या औषधांसह तेथे गेल्या आहेत आणि त्यांना त्यांची केव्हाही गरज पडू शकते.
कोरोनामधून बरे झाल्यानंतरही सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना औषधांची गरज आहे. ईडीचे सहाय्यक संचालक स्तरावरील अधिकारी सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहेत. राहुल गांधी, अशोक गेहलोत, आनंद शर्मा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेतेही कार्यालयात जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या निमित्ताने काँग्रेसने ताकद दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळीच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्ष कार्यालय गाठून सोनियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
दरम्यान, नरेंद्र मोदी सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सकाळी बैठक घेतली. तसेच, या नेत्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. मोदी सरकार सूडबुद्धीने राजकीय नेत्यांना त्रास देत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. काँग्रेसने देशभरातील ईडी कार्यालयांनाही घेराव करण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: दिल्लीत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
दरम्यान, लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी गोंधळ घातला. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत की नाही. सोनिया गांधी या सुपर ह्युमन आहेत का? सोनिया गांधी कायद्याच्या वर आहेत, असे काँग्रेसला वाटते. सोनिया गांधी यांना यापूर्वी ८ जून आणि २१ जून रोजी हजर राहण्यासाठी ईडीने बोलावले होते, परंतु त्यांनी मुदतवाढ मागितली होती. सोनिया यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच त्यांनी खटल्याला मुदतवाढ मागितली. यापूर्वी जूनमध्येही ईडीने राहुल गांधींची चौकशी केली होती.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या सरकारने ईडीला मूर्ख बनवले आहे. ही एजन्सी आता सूडाचे हत्यार बनली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने ५४ वर्षे देशाची सत्ता सांभाळली. आज अशा पक्षावर ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. हे खरे असू शकते?
Congress President Sonia Gandhi In ED Office for Enquiry Enforcement Directorate
Rahul Gandhi
Priyanka Gandhi