मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकशाही पद्धती असल्याने कोणती निवडणूक म्हटले की, त्यामध्ये वादविवाद, विरोध, भांडण वगैरे या गोष्टी जणू काही ठरलेल्याच असतात, पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये तर हे नेहमीच बघायला मिळते, याला कोणताही पक्ष अपवाद नाही. एकेकाळी भारतातील सर्वात मोठा मानला जाणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येऊन ठेपली असून या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या निवडणुकीबाबत आता विविध घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधींच्या बिनविरोध निवडीला कडाडून विरोध केला आहे.
काँग्रेस पक्षाला भविष्यात पुन्हा उभारी द्यायची असेल किंबहुना पुन्हा पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल, तर अध्यक्षपदातील घराणेशाही नष्ट करायला हवी, असे मत काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचे असून यासंदर्भात त्यांनी वारंवार विरोधात दर्शविला आहे तर दुसरीकडे गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही, असा विचारही नेहमीच मांडला जातो.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असून राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्षपदी नियुक्त करावे, यासाठी अनेक राज्यांमध्ये हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते हे राहुल गांधींना अध्यक्ष होण्यापासून विरोध करीत आहेत, किंबहुना अध्यक्षाची निवड ही लोकशाही पद्धतीने व्हावी, यासाठी त्यांचा आग्रह आहे. त्याच वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते शशी थरूर हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत, असेच दिसून येते.
महाराष्ट्रातील बहुतांश काँग्रेस नेत्यांनी देखील अध्यक्षपदी राहुल गांधी यांनी विराजमान व्हावा अशी इच्छा तथा अपेक्षा व्यक्त केली आहे मात्र त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कडाडून विरोध आहे. कारण काल दि. १९ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने काल मंजूर केला. हा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी त्याला अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व प्रतिनिधी हात उंचावून समर्थन देत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी हातवर केला नाही. तसेच या ठरावाला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी २०१९ च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु आहे तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी काही राज्ये राहुल गांधींच्या नावासाठी आग्रही आहेत.त्याच वेळी मनीष तिवारी, शशी थरूर व कार्ति चिदंबरम यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.
अनेक वर्षांनी काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार २४ सप्टेंबरपासून नाम निर्देशन दाखल केले जातील. १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होईल आणि १९ ऑक्टोबरला निकालाची घोषणा होईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधींनी अद्यापर्यंत होकार दिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची असते. या प्राधिकरणाचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. हे प्राधिकरण वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक प्राधिकरण गठित करते आणि नंतर राज्य निवडणूक प्राधिकरणच जिल्हा आणि ब्लॉकमधील निवडणूक प्राधिकरण असते. ब्लॉक कमिटी आणि बूथ कमिटी मिळून प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडतात. हेच पीसीसी प्रतिनिधी अध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करतात. सन २०१७ च्या निवडणुकीत ९ हजार प्रतिनिधी होते. ज्या उमेदवाराला पीसीसी प्रतिनिधींकडून सर्वाधिक मते मिळतात तो विजयी घोषित केला जातो.
काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची तयारी सुरु असताना त्याआधीच काँग्रेस अध्यक्ष पदी राहुल गांधींना बसवण्यासाठी ७ राज्यातील काँग्रेस समितीने त्यासाठी ठराव पास केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्रासह ७ राज्यांच्या काँग्रेस समितीने राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष होण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठीचा हा प्रस्तावही या राज्यांनी पास केला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांनी नकार देत गांधी घराण्याबाहेरच्या नेतृत्त्वासाठीही त्यांनी आग्रह धरला होता. तसेच नुकत्याच कन्याकुमारी येथे झालेल्या एका परिषदेत या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी अध्यक्ष होणार की नाही, हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व राज्यात काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतही राहुल गांधींच्या नावाची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र महाराष्ट्रात तसे घडले नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी आणि राहुल गांधी यांनी त्यात भाग घ्यावा, अशी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या जी-२३ गटातील आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी जी-२३ गटाची मागणी आहे. त्यामुळे त्यांचा राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला विरोध आहे. वास्तविक पाहता पृथ्वीराज चव्हाण हे कायमच गांधी घराण्याचे निष्ठावान राहिले आहेत, इतकेच नव्हे तर त्यांच्या मातोश्री खासदार स्व. प्रमिलाकाकी चव्हाण यादेखील इंदिरा गांधींच्या निष्ठावान कार्यकर्त्या होत्या, असे दिसून येते.
Congress President Election Rahul Gandhi Prithviraj Chavhan
Politics