मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यसभेत काँग्रेससमोर संकट निर्माण झाले आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे सदस्य कमी होणार आहेत. त्याहून चिंताजनक गोष्ट म्हणजे काँग्रेसचा भौगोलिक आलेख मर्यादित होत आहे. देशात १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून राज्यसभेत जाणारा काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नसेल.
मार्चअखेर राज्यसभेत काँग्रेसचे ३३ खासदार होते. ए. के. अँटोनी यांच्यासह चार खासदार निवृत्त झाले आहेत. तर जून आणि जुलैमध्ये आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि कपिल सिब्बल यांचा समावेश आहे. निवडणुकीनंतर राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांची संख्या ३० पर्यंत मर्यादित होणार आहे.
काँग्रेसचे इतके कमी खासदार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके सहा जागांपैकी एक जागा देईल अशी काँग्रेसला आशा आहे. त्यानंतर काँग्रेसची सदस्यसंख्या ३१ होईल. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, तेलंगण, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, दिल्ली आणि गोव्यातून काँग्रेसचा एकही खासदार नसेल.
सतरा राज्यांमध्ये काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. निवडणुकीनंतर अनेक मोठ्या राज्यांमधील काँग्रेसचा एकही खासदार राज्यसभेत नसेल. पंजाबमधील सत्ता हातातून गेल्यानेही काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, तेलंगण, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरमॉ आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.