नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस चौकशी झाल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज पुन्हा अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. आज दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांना मंगळवारी म्हणजे उद्या पुन्हा चौकशीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी मध्य दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवर असलेल्या ईडी मुख्यालयात आज सकाळी ११.०५ च्या सुमारास सीआरपीएफ जवानांच्या “झेड+” श्रेणीच्या सुरक्षेसह पोहोचले. राहुल गांधींनी त्यांचा 52 वा वाढदिवस कालच साजरा केला आहे. दुसरीकडे, सोनिया गांधी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविड-19 च्या प्रकृतीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी येत्या २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीने सोनिया गांधी यांना बजावले आहे.
केंद्रीय तपास संस्थेच्या कार्यालयाभोवती पोलिस आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत आणि कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी जेवणासाठी ईडी कार्यालयातून बाहेर आले आणि सुमारे तासाभरानंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले.
52 वर्षीय राहुल गांधी यांची ईडी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सलग तीन दिवस 30 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती, ज्यादरम्यान मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. शुक्रवारी ते पुन्हा तपास यंत्रणेसमोर हजर होणार झाले. परंतु आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीतून सूट मिळावी, अशी विनंती राहुल यांनी केली. ती ईडीने मान्य केली. त्यानंतर आज राहुल पुन्हा चौकशीसाठी हजर झाले.
राहुल गांधींना ‘यंग इंडियन’ची स्थापना, ‘नॅशनल हेराल्ड’ चालवणे आणि काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ला दिलेली कर्जे आणि मीडिया संस्थेमध्ये निधी हस्तांतरित करण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते. ‘यंग इंडियन’च्या शेअरहोल्डर्समध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतर काही काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसने ईडीच्या कारवाईला भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे सूडाचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.
congress mp rahul gandhi ed enquiry national herald case money laundering