इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भाजप खासदार निशिकांत दुबेंना काँग्रेसच्या मराठी खासदारांनी महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर तोंडावर जाब विचारत चांगलाच दणका दिला.
लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच त्यांना घेरलं. मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं.
या घटनेबद्दल खा. वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले की, आवाज महाराष्ट्राचा!! संसद भवनात गर्जला महाराष्ट्र माझा!
माय मराठीचा आणि महाराष्ट्राचा अवमान करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना संसदेतच जय महाराष्ट्राचा दणका दाखवला!
संसद भवनात मराठीचा आवाज घुमला आणि मराठी माणसाला, महाराष्ट्राला डिवचणाऱ्या दुबे यांना काढता पाय घ्यावा लागला. मराठी स्वाभिमानावर केलेला हल्ला सहन करणार नाही. हा महाराष्ट्राचा इशारा आहे — ठणठणीत आणि स्पष्ट! जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र!