बंगळुरू – देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष नेहमीच नैतिकतेचे धडे देत असतो. परंतु कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार आणि वरिष्ठ नेत्याने केलेली कृती अगदी त्याविरुद्ध आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी बलात्काराबद्दल विनोद करून परिस्थितीचे गांभीर्य नष्ट केले आहे. रमेश कुमार म्हणाले, की बलात्कार होत असेल तर झोपून जा आणि आनंद घ्या. या वक्तव्यावरून एकच वादंग निर्माण झाल्यानंतर रमेश कुमार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करून माफी मागितली आहे.
कारवाईची मागणी
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी रमेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, लाजिरवाणी कृती, लाजिरवाणी कृती. पक्षाने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे. दुसर्यांनी असा कधीच विचार करू नये असे हे उदाहरण आहे. तुमच्याकडे जर असे लोक विधानसभा किंवा संसदेत असतील तर परिवर्तन कसे होईल. त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून असे बोलण्याची कोणीही हिम्मत करणार नाही. ही घृणास्पद बाब आहे. मी स्तब्ध झाले आहे.
नेमके काय घडले
कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. येथे काँग्रेसच्या आमदारांनी गुरुवारी गोंधळ घातला. सगळी कामे थांबवून आधी शेतकरी आंदोलनावर चर्चा करावी, अशी आमदारांची मागणी होती. त्यावर विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आधी नकार दिला. परंतु नंतर काँग्रेस आमदार गोंधळ घालू लागल्याने अध्यक्ष कागेरी म्हणाले, की मला हे चांगले वाटणार नाही, परंतु शांत बसून या चर्चेचा आनंद घेईन. विधानसभा अध्यक्षांचे हे म्हणणे ऐकून काँग्रेस आमदार रमेश कुमार उभे राहिले आणि म्हणाले, की बलात्कार होणारच असेल तर त्याचा आनंद घ्या. दुर्दैवाची गोष्ट ही होती की रमेश कुमार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही अध्यक्ष कागेरी खळखळून हसत होते.
रमेश कुमार यांचे वादग्रस्त वक्तव्य
फेब्रुवारी २०१९ मध्ये रमेश कुमार विधानसभा अध्यक्ष होते. तेव्हाही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ते म्हणाले होते की, माझी परिस्थिती बलात्कार पीडितेसारखी आहे. बलात्कार फक्त एकदा झाला होता. जर पीडिता शांत असेल, तर ठिक आहे. जर तक्रार केली की बलात्कार झाला आहे. त्यावर आरोपीला कारागृहात टाकले जाते. परंतु तिला वकील विचारतात की ही घटना कधी झाली, कशी झाली किती वेळा झाली. न्यायालयात १०० वेळा बलात्कार करतात. तशीच माझी परिस्थिती आहे. अशी वक्तव्ये त्यांनी केली होती.