पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीने कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपला चारीमुंड्या चित केले आणि २८ वर्षांची राजवट खालसा केली. त्यानंतर भाजपला मात देणाऱ्या रवींद्र धंगेकरांचीच महाराष्ट्रात चर्चा आहे. पण धंगेकरांनी १४ वर्षांपूर्वी माजी मंत्री गिरीश बापट यांना दिलेली टक्करही त्यानिमित्ताने आठवली जात आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्याविरोधात रवींद्र धंगेकर उभे होते. त्यावेळी धंगेकर काहीच करू शकणार नाही असे सर्वांना वाटत होते. अर्थात धंगेकरही नवीन होते आणि ते ज्या पक्षाकडून लढले होते तो पक्षही नवा होता. धंगेकर यांना मनसेने तिकीट दिले होते. राज ठाकरे यांचा विश्वास अगदी पक्का होता. कारण धंगेकर बापटांना घाम फोडतील, याची त्यांना खात्री होती.
अगदी तसेच झाले आणि मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपचे टेंशन वाढतच होते. अखेर विजय भाजपचाच झाला. पण गिरीश बापट अवघ्या सात हजार मतांनी विजयी झाले होते. आतापर्यंत रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा प्रवास झालेला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघांच्या महाविकास आघाडीतर्फे विजय खेचून आणला आहे.
चारवेळा नगरसेवक
रवींद्र धंगेकर चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अफाट आहे. या लोकप्रियतेची प्रचिती २००९च्या विधानसभा निवडणुकीत आली होती आणि त्यानंतर आताही महाराष्ट्राने तेच अनुभवले.
आठवी पास नेता
रवींद्र धंगेकर फक्त आठवा वर्ग उत्तीर्ण आहेत. पण त्यांच्या राजकीय प्रवासावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांना लोकांचे प्रेमच मिळाले. कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करताना त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीत त्याचा उल्लेख आहे. यातूनच धंगेकर ७.२० कोटींचे मालक असल्याचेही कळते.
Congress MLA Ravindra Dhangekar Profile