मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेना पक्षात उभी पडली असून अद्यापही मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे भाजपने देखील सत्तेत सहभागी होत देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावले आहे. त्यानंतर आता या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचाही हालचाली सुरू झाल्या आहेत.
तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले आहे. त्यामुळे कदाचित या पक्षातही काही अंतर्गत बदल होण्याची शक्यता आहे. तर चौथ्या बाजूला काँग्रेस पक्षांमध्ये देखील काही आमदारांनी पक्षविरोधी तथा वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान क्रॉस व्होटिंग आणि गैरहजर आमदारांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. पक्षाने 11 आमदारांना नोटीस पाठवून उत्तरे मागितली आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होट केले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीत 11 आमदार सहभागी झाले नाहीत. यापैकी सात आमदार असे आहेत जे एमएलसी निवडणूक आणि बहुमत चाचणीत सहभागी नाहीत.
विशेष म्हणजे या सर्व आमदारांना पक्षाने नोटीस बजावून उत्तरे मागितली आहेत. या सर्वांवर कारवाई जवळपास निश्चित असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काँग्रेसने एमएलसी निवडणुकीत दोन उमेदवार दिले होते. पहिली पसंती चंद्रकांत हंडारे आणि दुसरी पसंती भाई जगताप यांना द्या, अशा स्पष्ट सूचना पक्षाने आमदारांना दिल्या होत्या. परंतु आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे प्रथम पसंती चंद्रकांत हंडारे यांना गमवावी लागली. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, हांडारे यांचा पराभव काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने घेतला आहे. त्यामुळे या आमदारांवरची कारवाई जवळपास निश्चित झाली आहे.
Congress MLA Action MLC Election Cross Voting Nana Patole meet Sonia Gandhi