विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशाच्या अलीकडच्या राजकीय इतिहासाचा मागोवा घेतला असता असे दिसून येते की, एखाद्या राजकीय नेत्याला पक्षात योग्य न्याय मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या कार्याचे चांगले चीज झाले नाही किंवा तो व्यक्ती मोठ्या पदावर पोहोचू शकला नाही. असे त्या पक्षातील तसेच अन्य पक्षातील नेते किंवा कार्यकर्ते नेहमीच म्हणत असतात. आता देखील अशीच एक घटना घडली आहे त्याचे असे झाले की, मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि एकूण सात वर्षे पूर्ण झाल्याने आभासी बैठकीत राज्य सरकारचे मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी त्यांचे कौतुक केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, आता कोव्हीड १९ च्या उद्रेकानंतर केंद्र सरकार हे राज्य सरकारवर दोषारोप करीत आहेत. मात्र केंद्राने सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्या हातात ठेवले आहेत. त्याच वेळी मोदी सरकारमध्ये आपले आवडते मंत्री कोण आहेत? असे विचारले असता चव्हाण म्हणाले की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल चांगले बोलता येईल. वैचारिक मतभेद असूनही ते इतर पक्षांशी कायम चांगला संवाद ठेवतात. खरे म्हणजे गडकरी हे चुकीच्या पक्षातील योग्य व्यक्ती आहेत. महाराष्ट्राबद्दल त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन आहे, परंतु त्यांची शक्ती सतत कमी करण्यात येत आहे.
सध्या सुमारे १२ कोटी लोकांच्या नोकर्या गमावल्या आहेत. तसेच महागाई वाढली असून पेट्रोलचे दर १०० रुपयांवर गेले आहे. याउलट बांगलादेशचे दरडोई उत्पन्न आता भारतापेक्षा जास्त आहे. केंद्राच्या धोरणांनी भारत देश उध्वस्त होत आहे. राज्याला सहाय्य आणि जीएसटी भरपाईसह सर्वच बाबतीत महाराष्ट्राविषयी केंद्राचा भेदभाव करणारा दृष्टीकोन आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.