नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या ५ वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. एका पिडीत मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे राहुल गांधी यांनी ट्विट केली होती. त्याप्रकरणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधी यांच्या ट्विटर खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचे ट्विटर खाते तात्पुरते निलंबित करण्यात आले. त्यानंतर रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या खात्यांवर पुन्हा अशीच कारवाई करत या नेत्यांची ट्विटर खाती ‘लॉक’ करण्यात आली आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसामचे पक्ष प्रभारी व माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह तसेच महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांची ट्विटर खाती निलंबित करण्यात आली आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एका नऊ वर्षीय मुलीच्या कुटुंबाची छायाचित्रे ट्विट केली होती, ज्यांच्यावर दिल्लीत बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने राहुल गांधी यांच्या ट्विटची दखल घेतली आणि अल्पवयीन पीडितेच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेस नेत्याच्या खात्यावर कारवाई करण्याचे निर्देश ट्विटरला दिले. तसेच यापूर्वी ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, राहुल गांधी यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमुळे कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी बलात्कार पीडितेच्या पालकांसह छायाचित्र ट्विट केले होते. यामुळे त्यांचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे.