इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या काँग्रेससमोरील आव्हाने वाढतच चालली आहेत. आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी मरगळ आलेल्या काँग्रेसमध्ये जीव ओतण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु त्यांच्यासमोरच अंतर्गत गटबाजी उघड झाल्याने बलाढ्य भाजपसमोर काँग्रेसची काय परिस्थिती असू शकते, याची झलक पाहायला मिळाली आहे.
राहुल गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या प्रतिनिधींची शुक्रवारी हरियाणा काँग्रेसच्या निवडक नेत्यांसोबत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत जोरदार हमरीतुमरी झाली. आगामी लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा काँग्रेसला बळकट करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. हरियाणा काँग्रेस समितीच्या नेतृत्वावरून अंतर्गत गटबाजीला उधाण आल्यामुळे बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. सध्या कुमारी शैलजा यांच्याकडे हे पद आहे. भूपेंद्र सिंह हुड्डा आणि शैलजा यांच्यात चांगले संबंध नाहीत. अंतर्गत कलह, गटबाजी, जातीचे समीकरण आणि पक्षश्रेष्ठींचे पक्षांतर्गत अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे काँग्रेसचा पंजाबमध्ये दारूण पराभव झाला होता.
पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा काँग्रेसच्या नेत्यांनी त्वरित मैदानात उतरण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. बैठकीदरम्यान जेव्हा त्यांनी राज्यातील नेत्यांना आपले मत मांडायला सांगितले, तेव्हा अंतर्गत कलह उघड झाला. हुड्डा यांच्या गटाने सहकार्य केले नाही. तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीने सतत आवाहन करूनही मदत केली नसल्याची तक्रार कुमारी शैलजा यांनी बैठकीत केली. त्यांना तीन ते चार गटांसोबत संघर्ष करावा लागला, अशी खंत व्यक्त केली.
कुमारी शैलजा यांनी राहुल गांधी यांच्यासमोर चांगलीच आगपाखड केली. त्या म्हणाल्या, की भाजपविरोधात लढा बळकट करण्यासाठी काही नेत्यांनी कधीच सहकार्य केले नाही. तथापि, हरियाणाचे विरोधी पक्षनेते हुड्डा यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, की हरियाणा काँग्रेस पक्ष तत्काळ बळकट करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांशी लढा देताना आपण कधीच मागे नव्हतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, हुड्डा यांचे पुत्र दीपेंद्र हुड्डा यांनी निवडणुकीपूर्वी एका योग्य रणनीतीच्या आवश्यकतेवर भर देत हरियाणामधील जाट नेतृत्वाची खुलेपणाने दावेदारी केली. पीसीसी नेतृत्वासाठी हुड्डा गटाचे ते पहिली पसंद असल्याचे बोलले जात आहे.
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विविध राज्यांमधील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून वेगाने सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी हरियाणा येथील काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला बळकट करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. राहुल गांधी यांनी येथील नेत्यांसोबत स्वतंत्रपणे भेट घेऊन नंतर एकत्रितपणे चर्चा केली. यादरम्यान पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हुड्डा गटाने त्यांच्या मागण्या समोर ठेवल्या, तर विरोधी गटना त्याला विरोध केला.