इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी गुजरातमध्ये अनेक ठिकाणी सभा घेण्याची ठरविलेले दिसते, त्यातच एका सभेत त्यांनी उपस्थित नागरिकांसमोर बोलताना गुजरातच्या जनतेला विकासाकडे नेण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणणार असल्याचे सांगितले, तसेच मूलभूत सुविधा म्हणजे गॅस सिलेंडर, वीज पुरवठा आदि संदर्भातही त्यांनी घोषणांची खैरात केली याची आता जोरदार चर्चा सुरू आहे. कारण गुजराती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम स्टेट असल्याने चर्चा आणखीनच रंगलेली आहे.
गुजरातमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली तरी राजकीय पक्षांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. आप या पक्षाने गेल्याच महिन्यात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केलेली असताना आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. गुजरातमध्ये जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
याचबरोबर राहुल गांधी यांनी अनेक आश्वासने दिली आहेत. गुजरातच्या लोकांना ५०० रुपयांत सिलिंडर दिला जाईल, तसेच ३०० युनिटपर्यंत लोकांना मोफत वीज दिली जाईल, असेही आश्वासन राहुल यांनी दिले आहे. अहमदाबादमधील ‘परिवर्तन संकल्प रॅलीनंतर नागरिकांना संबोधित करताना राहुल गांधींनी ही आश्वासने दिली आहेत. यामध्ये 10 लाख नवीन नोकऱ्या देणे, ३ हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निर्मिती, मुलींसाठी मोफत शिक्षण आदी आश्वासने देखील आहेत.
गुजरातचे भाजप सरकार बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करेल, पण त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? असा सवाल करत त्यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास प्रत्येक शेतकऱ्याचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन दिले.
सध्या १ हजार रुपयांना विकला जाणारा गॅस सिलिंडर ५०० रुपयांना देऊ, असेही ते म्हणाले. तसेच आता गुजरात हे ड्रग्जचे हब बनले आहे, येथील बंदरातून देशात जाणारे सर्व ड्रग्ज बाहेर पडते. राज्य सरकार त्यावर कारवाई करत नाही, असा आरोपही राहुल यांनी केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचे आश्वासनही दिले. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, असे ते म्हणाले. यासोबतच तरुणांना ३ हजार रुपये बेरोजगारी भत्ताही दिला जाणार असल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले.
Congress Leader Rahul Gandhi Promise to Gujrati People
Upcoming elections Electricity Free LPG Cylinder 500 Rs