नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. कन्याकुमारी पासून निघालेली ही भारत जोडो यात्रा आता नवी दिल्लीत पोहोचली आहे. या यात्रेमुळे राहुल गांधींवर विरोधकांनी टीकेची राळ उडवली. परंतु या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याच यात्रेदरम्यान राहुल यांनी एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणजे त्यांना बायको कशी हवी आहे.
काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत होती. काही काळ ते काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्याची जबाबदारी घेत राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या काही वर्षात राहुल यांनी संघटना बांधणीवर विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. केरळमधील वायनाड मतदारसंघाचे राहुल हे प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधी हे भारतीय युवक काँग्रेस व भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत. तसेच राजीव गांधी फाउंडेशन आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत.
राहुल गांधी हे त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांची खूप काळजी घेत असल्याचे दिसून येते. सध्या ते ५३ वर्षांचे आहेत. अद्यापही त्यांचे लग्न झालेले नाही. याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापने १३८ वर्षे पूर्ण झाली असून वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल सामील झाले. तत्पूर्वी, राहुल गांधींनी पहिल्यांदाच आपल्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली पत्नी कशी असावी, याबाबत खुलासा केला.
राहुल गांधींना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राहुल म्हणाले की, माझ्या आयुष्यातील पहिले प्रेम इंदिरा गांधी आहेत. यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला अशा स्त्रीशी लग्न करायचे आहे का, ज्यात तुमच्या आजीसारखे गुण असतील? यावर राहुल म्हणाले की, हा एक मनोरंजक प्रश्न आहे. मला अशी स्त्री हवी आहे, जिच्यात माझी आई आणि आजी दोघींचेही गुण असतील. कारण राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी या दोघांचाही प्रभाव आहे. तसेच राहुल गांधी यांना अनेकदा पप्पू म्हटले जाते. याबाबत विचारले असता, राहुल म्हणाले- नाही, ही त्यांची प्रचाराची पद्धत आहे. त्यांच्या मनात भीती आहे, त्यामुळेच ते (विरोधक) असे म्हणतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
Congress Leader Rahul Gandhi on Marriage Girl