नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी देशभरातील अनेक विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट घेत आहेत. याचअंतर्गत ते महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावरुन सध्या राज्यातील राजकारण पेटले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षामध्येही त्यांच्या दौऱ्यावरुन मतभेद असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे दिसत आहे. विशेषतः ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे मालेगावच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वा.सावरकरांवरील वक्तव्याबाबत राहुल गांधी यांना यांच्यावर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट त्यासाठीच होणार असल्याच्याही सध्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र त्याचवेळी भाजपच्या दोन नेत्यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तावित दौऱ्या विरोधात वेगवेगळी भूमिका घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही राहुल गांधींनी दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला भाजपचा विरोध दिसून येतो. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी स्वा. सावरकर यांची माफी मागावी. मगच राज्यात पाय ठेवावा, बावनकुळे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. बावनकुळेंच्या वक्तव्याला आता काँग्रेसकडून विरोध होत आहे.
आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र वेगळेच वक्तव्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याला आमचा विरोध असण्याचे कारणच नाही, राहुल गांधींच्या दौऱ्याला भाजपा कशाला विरोध करेल? भाजपाने नेहमीच लोकशाही परंपरा कायम ठेवली असून त्यांनी मात्र आणीबाणी लादून लोकांना तुरुंगात टाकले होते. राहुल गांधींनी महाराष्ट्रात यावे, आम्ही विरोध करण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होत नाही. आमचा पक्ष हा लोकशाीचा सन्मान कराणारा पक्ष आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यांना खलिस्तानी आणि दहशतवादी म्हणाले, त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली काय? महाराष्ट्राचे आधीचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, कोश्यारींनी या महापुरुषांची माफी मागितली काय? जर भाजपात धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसाला सुद्धा हात लावून दाखवा, असे खुले आवाहन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. भाजपाच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यावर बोलल्याशिवाय झोप लागत नाही, अशी टीका पटोले यांनी केली.
Congress Leader Rahul Gandhi Maharashtra Tour Politics