नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात नव्याने समन्स बजावले असून त्यांना आता १२ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या समन्समध्ये त्यांना 2 जून रोजीच बोलावण्यात आले होते, मात्र ते परदेश दौऱ्यावर असल्याने हजर झाले नाहीत. राहुल गांधींशिवाय त्यांची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. त्यांना केंद्रीय एजन्सीने 8 तारखेला दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. सोनिया गांधींना सध्या कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्या 8 जूनला हजर होण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.
राहुल गांधींनी ईडीला पत्र लिहून ते विदेश दौऱ्यावर असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी नवीन तारखेची मागणी केली होती. त्यानुसार ही नवी तारीख देण्यात आली आहे. राहुल गांधी ५ जूनला भारतात परतण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. या समन्सबाबत माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्ही धमकावणे आणि धमकावण्याच्या कारवाईपुढे झुकणार नाहीत.
सिंघवी म्हणाले की, ईडी ने 2015 मध्ये प्रकरण बंद केले होते. परंतु केंद्र सरकारने त्या अधिकाऱ्यांना हटवले आणि नवीन अधिकारी आणून हे प्रकरण उघडले आहे. एवढेच नाही तर ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंग अंतर्गत तपास करत आहे, ज्याला कोणताही आधार नाही. या प्रकरणात कोणतीही मालमत्ता किंवा पैशांचे हस्तांतरण झाले नाही. त्यामुळे मनी लाँड्रिंग अंतर्गत तपासाला कोणताही आधार नाही, असे संघवी यांनी स्पष्ट केले.
National Herald case: Enforcement Directorate issues fresh summons to Rahul Gandhi
Read @ANI Story | https://t.co/X85Ep4Qvd9#NationalHeraldCase #RahulGandhi #ED pic.twitter.com/8cdRToiAYj
— ANI Digital (@ani_digital) June 3, 2022