नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी त्यांच्यासमोर ईडीच्या प्रश्नांची मोठी यादी असेल. काँग्रेसशी संबंधित कोट्यवधीच्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल)ची मालमत्ता असलेल्या यंग इंडियनच्या संपादनाशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारासाठी काँग्रेसचे माजी कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा जबाबदार होते, असे राहुल गांधी यांनी ईडीसमोर सांगितले आहे.
गांधी कुटुंबीयांकडून एजेएलची मालमत्ता सांभाळणाऱ्या यंग इंडियन (यंग इंडिया) शी संबंधाबाबत राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ईडीच्या सूत्रांनी सांगितले, की यंग इंडियनकडून घेतलेले कर्ज किंवा गृहनिर्माण प्रवेशाबाबत कोणतीच माहिती नसल्याचे राहुल गांधी यांनी ईडीला सांगितले आहे. हे काम मोतीलाल व्होरा पाहात होते, परंतु त्यांचे निधन झाले आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी विश्रांती मागितल्यामुळे त्यांची शुक्रवारी चौकशी सुरू राहणार आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे यंग इंडियनची ७६ टक्के भागीदारी आहे. तर मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस (प्रत्येकी १२ टक्के) यांच्याकडे २४ टक्के भागीदारी आहे. मोतीलाल व्होरा यांचे डिसेंबर २०२० मध्ये आणि फर्नांडिस यांचे सप्टेंबर २०२१ मध्ये निधन झाले होते.
राहुल गांधी यांना रात्री ११ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारे बाहेर जाऊ दिले जात नाही हे आरोप ईडीच्या सूत्रांनी फेटाळून लावले आहेत. दर तीन तासांच्या चौकशीनंतर ते आपल्या प्रतिक्रियांचा आढावा घेण्यासाठी ३-४ तासांचा ब्रेक घेतात. आम्हाला त्यांची चौकशी करण्यासाठी फक्त सहा तासच मिळत आहेत. त्यामुळे त्यांना रात्री उशीर होतो, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांची २३ जूनला चौकशी केली जाणार आहे. कोविडमुळे त्यांनी चौकशीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. काँग्रेस पदाधिकारी मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे सध्याचे कोषाध्यक्ष पवन बंसल यांचे जबाब नोंदविण्यासाठी ईडीने एप्रिलमध्ये त्यांना समन्स पाठवला होता. खर्गे आणि बंसल हे दोघेही यंग इंडिया आणि एजेएलमध्ये पदाधिकारी आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, यंग इंडियाच्या एजेएलच्या संपादनानंतर यंग इंडियाचे दोन संस्थापक सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांनी एक भागधारक म्हणून सोनिया गांधी आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे शेअर्स हस्तांतरित केले होते. परिणामी यंग इंडियाचे हस्तांतरण आणि नियंत्रण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हातात आले होते. दोघेही बहुसंख्यक भागधारक आहेत. प्रत्येकाकडे ३८ टक्के भागीदारी होती. त्यांचे निकटवर्तीय मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे प्रत्येकी १२ टक्के भागीदारी होती. असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
एजेएल आणि यंग इंडिया या दोन्ही कंपन्यांच्या संचालकांचा समूह एकच होता. ते सर्व काँग्रेसचे पदाधिकारी होते. यंग इंडियाची स्थापना ५ लाख रुपयांनी झाली होती. कंपनीकडे एजेएलची देखभाल करण्यासाठी आर्थिक साधने नव्हती. त्यावर काँग्रेसचे ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. ईडीच्या डॉसियरनुसार, ९०.२१ कोटी रुपयांचे कर्ज घेताना यंग इंडियाकडे काहीच निधी नव्हता. त्यामुळे त्यांनी कोलकाता येथील डोटेक्स मर्चेंडाइज प्रायव्हेट लिमिटेड या मुखवटा कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा केला होता.