नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – न्यायाधीश कोणाताही पक्षपात करत नाही, असे म्हटले जाते. म्हणजेच न्यायाधीशाने निःपक्षपणे न्यायदान करावे, अशी घटनेत तरतूद आहे. मात्र काही वेळा न्यायाधीशांवर देखील पक्षपातीपणाचा आरोप करण्यात येतो. सध्या गुजरातमधील एका न्यायाधीशावर असाच आरोप करण्यात येत आहे. परंतु यात किती तथ्य आहे हे माहीत नाही, मात्र, एका वेगळ्याच कारणासाठी संबंधित न्यायाधीशांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.
सुरतचे न्यायदंडाधिकारी हरीश हसमुखभाई वर्मा यांनी मोदी आडनाव वाद प्रकरणी मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली, तसेच त्यानंतर त्यांचे खासदार पद देखील रद्द करण्यात आले. गुजरात उच्च न्यायालयाने १० मार्च २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार हरीश वर्मा यांच्यासह एकूण ६८ न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. सदर न्यायाधीश हे ६५ टक्के पदोन्नती कोट्याखाली घेण्यात आलेल्या परीक्षेत यशस्वी झाले होते. हरीश वर्मा यांच्याबद्दल सांगण्यात येते की, २०० गुणांच्या या परीक्षेत त्यांना १२७ गुण मिळवून ते वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश ते जिल्हा न्यायाधीश संवर्गातील पदोन्नतीसाठी पात्र ठरले.
न्यायाधीश वर्मा यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. हरीश हसमुखभाई वर्मा यांच्यासह ६८ न्यायाधीशांची पदोन्नती रद्द करण्यासाठी गुजरातच्या दोन न्यायिक अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पदोन्नतीला आव्हान देण्यात आले आहे. आता सुप्रीम कोर्टात ८ मे रोजी सुनावणी होणार आहे.
गुजरातच्या वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संवर्गातील दोन न्यायिक अधिकारी रवी कुमार मेहता आणि सचिन प्रजापती मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या याचिकेत हरीश हसमुखभाई वर्मा यांच्यासह ६८ अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द करून गुणवत्ता व ज्येष्ठतेच्या आधारे नव्याने यादी तयार करावी, अशी मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे की, यात असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी पदोन्नतीसाठीच्या परीक्षेत जास्त गुण मिळवले पण त्यांची निवड झाली नाही. तर त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवाराला बढती देण्यात आली आहे. यात हरीश हसमुखभाई वर्मा यांचीही पदोन्नतीनंतर बदली झाली असून त्यांची राजकोट जिल्हा न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Congress Leader Rahul Gandhi Court Judge Promotion