इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी दावा केला आहे की, त्यांना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून एमएफ हुसैन यांचे पेंटिंग विकत घेण्यास भाग पाडण्यात आले होते. तसेच, चित्रातून मिळालेली रक्कम गांधी परिवाराने सोनिया गांधींवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेण्यासाठी वापरली होती. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे.
राणा कपूर यांनी ईडीला सांगितलेली माहिती समोर आली आहे. तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी कपूर यांना एमएफ हुसैन यांचे पेंटिंग विकत घेण्यास नकार दिल्यास केवळ गांधी घराण्याशीच नव्हे तर त्यांच्यासोबतचे संबंधही बाधित होतील, असे म्हटले होते. तसेच ‘पद्म’ पुरस्कार मिळण्यात अडचणी निर्माण होतील असा इशाराही दिला होता. राणा कपूरचे हे कथित विधान विशेष न्यायालयात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या दुसऱ्या पुरवणी आरोपपत्राचा (एकूण तीन) भाग आहे. येस बँकेचे सहसंस्थापक, त्यांचे कुटुंब, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHEL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवन आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
याबरोबरच, कपूर यांनी दावा केला आहे की त्यांनी पेंटिंगसाठी २ कोटी रुपयांचा धनादेश दिला. या पेंटिंगच्या विक्रीतून मिळणारी रक्कम गांधी परिवार सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरणार असल्याची माहिती देवरा यांनी गुप्तपणे दिल्याचा दावा त्यांनी केला. कपूर यांनी ईडीला असेही सांगितले की, सोनिया गांधींचे जवळचे सहकारी अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात गांधी कुटुंबाला योग्य वेळी मदत करून त्यांनी चांगले काम केले आहे आणि त्यांच्या नावाचा ‘पद्मभूषण’ बहाल करण्यासाठी विचार केला जाईल. कपूर यांनी असाही दावा केला आहे की, पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर आणि येस बँकेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी धमकीही देण्यात आली होती.
कपूर यांना मार्च २०२०मध्ये अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. कपूर यांनी प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून खरेदी केलेल्या कथित पेंटिंगबाबत आरोपपत्रात म्हटले आहे की, “सर्वप्रथम, मी हे सांगू इच्छितो की ही एक जबरदस्त विक्री होती ज्यासाठी मी कधीही तयार नव्हतो.” मिलिंद देवरा यांनी त्यांच्या (राणा कपूर) घर आणि कार्यालयात अनेकदा भेट दिली आणि त्यांना प्रियंका गांधी वड्रा यांच्याकडून एमएफ हुसैन यांचे चित्र विकत घेण्यास प्रवृत्त केले. याविषयी दबाव आणण्यासाठी मला वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून अनेक वेळा कॉल केले गेले. या सगळ्या प्रकरणामुळे गांधी घराण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तथ्य पडताळणीचं काम सध्या सुरु आहे.