नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आयोजित नव संकल्प शिबिरात त्या नुकत्याच सहभागी झाल्या होत्या. तूर्तास त्यांनी स्वतःला वेगळे केले आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंता वाढली आहे कारण, या शिबिरात सहभागी इतर नेत्यांनाही संसर्ग होण्याची भीती आहे. प्रियंका यांच्या आई आणि काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही कोविडची बाधा झाली आहे.
राजधानी लखनौमध्ये सुरू असलेल्या नव संकल्प शिबिरातून प्रियंकाही लवकरच निघून गेल्या होत्या. बुधवारी रात्री त्या दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांनी परतण्याचे कारण सांगितले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनिया गांधींना कोविडची लागण झाल्याची बातमी आल्यानंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या.
काँग्रेसने सांगितले आहे की, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे, परंतु नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात त्या 8 जून रोजी ईडीसमोर हजर होतील. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सुरजेवाला म्हणाले की, “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गेल्या आठवड्यापासून नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत होत्या. यातील काही लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. काँग्रेस अध्यक्षांना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला आणि कोविडची इतर काही लक्षणेही दिसून आली, त्यानंतर ही तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आम्ही आधी कळवल्याप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष 8 जून रोजी ईडीसमोर हजर होतील. काँग्रेस पक्ष भविष्यातील घडामोडींची माहिती देत राहील.” नंतर कर्नाटकात सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, सोनिया गांधी पूर्णपणे ठीक आहेत आणि ईडीसमोर हजर राहण्याचा त्यांचा निर्धार आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1532587439553843201?s=20&t=6-SBw2HPUzRMGFNFQb_xWQ