इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दिल्ली-रायपूर विमान टेक-ऑफसाठी सज्ज होते. अचानक पोलीस येतात, फ्लाईटमध्ये चढतात आणि एका प्रवाशाची बॅग चेक करायची आहे म्हणून सांगतात. त्या प्रवाशाला खाली उतरवतात आणि थेट अटक करून ठाण्यात घेऊन जातात. एखाद्या सिनेमातली प्रसंग वाटावा अशी घटना आज दिल्ली विमानतळावर घडली.
अटक झालेल्या प्रवाशाचे नाव आहे पवन खेडा. खेडा हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत रायपूर येथे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी निघाले होते. फ्लाईट टेकअॉफ होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी त्यांना आतच गाठले आणि बॅग चेक करायच्या निमित्ताने खाली उतरवले. बाहेर डिसीपी साहेब त्यांना भेटायला थांबले आहेत असे सांगितले आणि तिथेच अटक करून थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अख्खं फ्लाईट रद्द करण्यात आलं. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली आणि लगेच पर्यायी व्यवस्था केली. पण अशापद्धतीने अटक करण्यात आल्यामुळे सारेच गोंधळून गेले.
अनेकांच्या मनात वेगवेगळ्या शंका आल्या. पोलीस अचानक फ्लाईटमध्ये चढल्याने सुरक्षेच्या मुद्यावरून असे घडले असावे, अशी शंका निर्माण झाली. पण मुळात दिल्ली पोलिसांनी आसाम पोलिसांच्या शिफारशीवरून ही कारवाई केली आहे. याबद्दल प्रवाशांना कळल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. पवन खेडा मात्र या अटकेमुळे चांगलेच संतापले आहेत. आपल्याला का अटक करण्यात आली, हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आक्षेपार्ह विधानामुळे अटक
पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे आसाम येथील हाफलाँगमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खेडा यांनी मोदींबद्दल अपमानजनक विधान केल्याचे तक्रारीत नमूद होते. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांच्या विरोधात रिमांड काढले. दिल्ली पोलिसांनी याच रिमांडवरून त्यांना अटक केली. दिल्ली न्यायालयात हजर केल्यानंतर खेडा यांना आसामना नेण्यात येईल.
काँग्रेसकडून निषेध
पवन खेडा यांची अटक हुकुमशाहीतून झाली आहे. अशापद्धतीने कारवाई करण्याची सरकारची मानसिकता देशात हुकुमशाही सुरू असल्याचे सिद्ध करते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधील नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रीय अधिवेशनात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशातून हा प्रकार घडल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
https://twitter.com/INCIndia/status/1628663100940636162?s=20
Congress Leader Pavan Kheda Arrest High Voltage Drama