इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू मोठया कौटुंबिक वादात सापडले आहेत. कारण अमेरिकेत राहणाऱ्या सिद्धूची बहिण डॉ. सुमन तूर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुमन तूर यांनी सांगितले की, आपले वडील भगवंत सिद्धू यांच्या 1986मध्ये निधनानंतर भाऊ सिद्धूने आई निर्मल भगवंत आणि बहिणींना घरातून हाकलून दिले होते. नंतर 1989 मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनवर निराधार महिला म्हणून तिचा मृत्यू बेवारस अवस्थेत मृत्यू झाला होता. तसेच सिद्धूने नंतर जनतेला खोटे सांगितले की, तो (सिद्धू) दोन वर्षांचा असताना त्याचे पालक वेगळे झाले होते.
तसेच सिद्धूची बहीण असल्याचा दावा करणाऱ्या सुमन तूरने सांगितले की, ती नवज्योत सिद्धू यांना त्याच्या अमृतसर येथील घरी भेटायला गेली होती, पण त्यांनी गेट उघडले नाही. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद होता. नवज्योतसिंग सिद्धू आपल्या आई आणि वडिलांच्या विभक्त झाल्याबद्दल खोटे बोलत असल्याचे सुमन तूर यांनी म्हटले आहे.
सुमन पुढे म्हणाल्या की, नवज्योत सिद्धूची सासू जसवीर कौर यांनी आमचे घर उद्ध्वस्त केले आहे. माझ्या वडिलोपार्जित घरी मी नंतर कधीही जाऊ शकलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या डॉ. सुमन तूर यांना याबद्दल जेव्हा विचारण्यात आले की, इतक्या वर्षांनंतर निवडणुकीच्या वेळीच त्या आरोप का करत आहेत, तेव्हा त्या म्हणाल्या की, मला एक लेख मिळाला आहे, ज्यामध्ये नवज्योत सिद्धू यांनी माझ्या आई आणि वडील हे विभक्त होण्याचे विधान केले आहे. मात्र ते खोटे आहे. सिद्धू हा आमच्या कुटुंबाचा झाला नाही, तो दुसऱ्याचा काय होईल!. पैशासाठी नवज्योत सिद्धूने आईला बेवारस सोडले. सिद्धूने करोडोंची कमाई केली असली तरी तो कुटुंबाचा नाही. सिद्धूशी बोलण्यासाठी अनेक मेसेज पाठवले, पण त्याने मला ब्लॉक केले. मला एक बहीणही आहे. तिचा मृत्यू झाला आहे. भाई सिद्धू सर्व काही पुराव्यासह सांगतात. तसेच आईचा पुरावाही द्यायला हवा, असे मला वाटते. असे त्या म्हणाल्या.
नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांना सुमन तूर यांच्या आरोपांबाबत विचारण्यात आले असता, तिने सांगितले की मी त्यांना ओळखत नाही. सुमन तूर त्यांच्या आयुष्यात कधीच बोलली नव्हती. नवज्योत सिंग सिद्धूच्या वडिलांनी दोन लग्न केले होते. सुमन तूरचा जन्म पहिल्या आईपासून झाला असावा. दरम्यान, सिद्धूने आईच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे सिद्धू यांच्या कौटुंबिक बाबींना राजकीय वळण लागले आहे. शिरोमणी अकाली दलाचे मुख्य प्रवक्ते हरचरण बैंस म्हणाले की, आपल्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, असे सिद्धू म्हणायचे, मग हे काय आहे. सिद्धूने आपल्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल संपूर्ण जगासमोर खोटे सांगितले. आज जेव्हा त्याच्या बहिणीने कौटुंबिक फोटो दाखवले तेव्हा परिस्थिती स्पष्ट झाल्याचेही बैन्स म्हणाले.