नागपूर – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रात गंभीर आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर मिळत नाही. कोरोनामुळे जवळपास ६० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात हाताबाहेर जाणार्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक आणि आरोग्य आणीबाणी लावावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी याबाबत पंतप्रधान मोदी यांना एक पत्र पाठवले आहे.
आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रामध्ये राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. ६० हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लोक रस्त्यावर उतरतील. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम ३६० अन्वये राज्यात दोन महिन्यांची आणीबाणी लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आशिष देशमुख यांच्या या मागणीमुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारची अधिकच कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.