विशेष प्रतिनिधी, मुंबई
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले. येथील ब्रीच कँडी रुग्णालयात ते उपचार घेत होते. महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडिल होत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ गायकवाड हे उपचारार्थ रुग्णालयात दाखल होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेर आज बुधवारी सकाळी १० वाजता त्यांचे निधन झाले आहे. काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले. विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबई काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. महाराष्ट्रात काँग्रेसच्या विस्तारात त्यांचे योगदान मोठे आहे. अनेक नेत्यांना घडविण्यातही त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या निधनामुळे मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकल्याची प्रतिक्रीया अनेक नेत्यांनी दिली आहे. तसेच, विविध राजकीय पक्ष आणि क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.