भोपाळ (मध्य प्रदेश) – नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादाचा धुरळा उडवून दिला आहे. भोपाळ येथील नर्मदा भवन मंदिरात काँग्रेसच्या जनजागरण मोहिमेच्याप्रसंगी दिग्विजय सिंह काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
दिग्विजय सिंह म्हणाले, की स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, “जी गाय आपल्याच मलमुत्रात झोपत असेल, ती आपली माता कशी होऊ शकते. गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही”. परंतु वीर सावरकर यांनी हे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे हे मात्र त्यांनी सांगितले नाही. सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत सिंह म्हणाले, की सर्व हिंदू नागरिक गोमांस खातात. गोमांस खाऊ नये असे कुठे लिहिले आहे का, असे विचारत असतात. बहुसंख्य हिंदू नागरिक गोहत्येच्या विरोधात आहेत. आमचा लढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे. जर २०२४ मध्ये पुन्हा भाजपचेच आणि मोदींची सत्ता आली तर सर्वप्रथम ते राज्यघटना बदलतील. आरक्षण संपवतील. त्यांनी रशिया आणि चीनचे मॉडेल स्वीकारले आहे. गरिब नागरिकांना मोफत धान्य वाटप करून टाका आणि काही निवडक नागरिकांवर सर्व कमाई लुटवून द्या.
दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, दिग्विजय सिंह फक्त हिंदूंना बदनाम करण्याचेच काम करतात. वीर सावरकर यांच्यापासून देशभक्त संघटनांबद्दल उलटसुलट गोष्टी सांगून मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचे काम करत असतात. ते गोहत्येला प्रोत्साहन देत आहे. मुस्लिमांना चिथावणी देऊन हिंदू-मुस्लिम दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. दिग्विजय सिंह यांचा हिंदूविरोधी चेहरा उघड झाला आहे.
गाय आमची माता आहे
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सिंह यांनी ट्विट करून सांगितले, की गाय आमच्या आईसमान आहे. गोमांस करण्याचा विचार करणे पाप आहे. आम्ही बेरोजगारी, महागाईवर बोललो, चर्चा केली तर योग्य ठरेल. त्यांच्या या ट्विटवर नागरिकही प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, तुम्ही तुमच्या भावाला समजवा.