इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांपैकी अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. मंगळवारी सकाळीच दिल्लीपासून चेन्नईपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये पी. चिदंबरम यांच्या निवासी संकुलाचाही समावेश आहे. कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला आहे.
यापूर्वीही सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या घरावर अनेकदा छापे टाकले होते. दरम्यान, कार्तीने आपल्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्याबद्दल टोमणे मारणारे ट्विट केले आहे. ‘मी मोजणेही विसरलो, असे किती वेळा झाले? या छाप्यांचा रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.’ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने कार्ती आणि पी. चिदंबरम यांच्या घरासह सात ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने परदेशातून पैसे आणल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला आहे.
https://twitter.com/KartiPC/status/1526408125670121472?s=20&t=3tsxjo6Jh9nbz-PqeRWB-Q
कार्ती चिदंबरम यांना २०१० ते २०१४ दरम्यान पैसे मिळाले होते. याआधी सीबीआयने प्राथमिक तपासासाठी गुन्हा दाखल केला होता. तपासानंतर त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यापूर्वीही आयएनएक्स मीडिया प्रकरणात आर्थिक व्यवहारांबाबत कार्ती यांचे नाव समोर आले होते. तेव्हा २०१८मध्ये त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम अर्थमंत्री होते. यूपीए सरकारच्या काळात पी. चिदंबरम हे अत्यंत प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी अर्थमंत्री ते गृहमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यांनाही एका प्रकरणात अटकही झाली होती आणि तुरुंगात जावे लागले होते. आता मुलावरच्या छाप्याने पी. चिदंबरम यांच्या अडचणीत भर पडली आहे.
https://twitter.com/ANI/status/1526415637345882112?s=20&t=3tsxjo6Jh9nbz-PqeRWB-Q