संगमनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात नाशिकची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली. टोकाचे राजकारणही येथेच दिसले. या सर्वांवर मात करीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. थोरात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहिले. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधताना प्रथमच भावनांना वाट मोकळी करून दिली.
थोरात म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठे राजकारण झाले. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, झालेले राजकारण व्यथित करणारे होते. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोलले पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणे झाले आहे. योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. याकाळात आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचे काम झाले. पण, काँग्रेसचा विचारच आपला विचार आहे. पुढची वाटचालही याच विचाराने होणार असल्याचे त्यंनी स्पष्ट केले.
सत्तांतरणानंतर मोठे राजकारण
राज्यात सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणले जात आहे. त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न होताहेत. आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठे झालो आहे. यावेळीसुद्धा संघर्षातून नक्कीच बाहेर येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुखापतीतून सावरलोय
नागपूर अधिवेशनावेळी मी सकाळी फिरायला गेलो होतो. यावेळी चालताना माझा तोल गेला आणि मी पडलो. त्यामुळे खांद्याला दुखापत झाली. ब्रीच कॅंडी या रुग्णायात माझ्यावर उपचार झाले. डॉक्टरांनी मला एक महिना प्रवास करण्यास मनाई केली म्हणून मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, अशी महितीही त्यांनी दिली.
Congress Leader Balasaheb Thorat on Satyajit Tambe Politics